शाळा, महाविद्यालय बंद अन्‌ यांचे धंदे सुरूच; ग्रामपंचायतीने दिला दणका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

शिकवणीचालक खासगी शिक्षक सर्रास क्‍लास चालवित असल्याने गर्दी होत होती. समाजहिताकडे दुर्लक्ष करीत व शासन आदेशाची पायमल्ली करीत आहेत. अशा निनावी तक्रारी ग्रामपंचायतीकडे झाल्यात.

कापडणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णांची संख्याही वाढतच आहे. शाळा व महाविद्यालये सुरू होण्याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाही. शाळांसह खासगी शिकवणी सुरू करण्यासही परवानगी नाही. अशी स्थिती असताना देखिल येथील दहापैकी काही शिकवणी संचालकांनी खुलेआम शिकवण्या घ्यायला सुरवात केली. हा प्रकार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधितांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटिसा बजावल्यात. 
कापडणे येथील शिकवणीचालक खासगी शिक्षक सर्रास क्‍लास चालवित असल्याने गर्दी होत होती. समाजहिताकडे दुर्लक्ष करीत व शासन आदेशाची पायमल्ली करीत आहेत. अशा निनावी तक्रारी ग्रामपंचायतीकडे झाल्यात. पंचायतीने संबंधित तक्रारींची दखल घेत पडताळणीही केली व तसा प्रकार आढळून आला. सरपंच जया पाटील व ग्रामविकास अधिकारी किशोर शिंदे यांनी समाजहित लक्षात घेत सर्वच संचालकांना फौजदारी गुन्हा का दाखल करू नये, अशा आशयाची नोटीस बजावल्यात. 

धुळे शहरातून येणारा तो शिक्षक कोण? 
येथे दहा क्‍लासेस आहेत. त्यापैकी सात क्‍लास गेल्या दहा दिवसांपासून सुरू होते. काही शिक्षक धुळे शहरातून येथे शिकविण्यासाठी येत होते. पंचायतीने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर क्‍लास बंद झालेत. पण धुळे शहरातील रेड झोनमधून येणारे ते शिक्षक कोण, याची चर्चा गावात आता सुरू झाली आहे. 

तीन महिन्यांपासून क्‍लास बंद आहेत. खासगी शिक्षक पुन्हा बेरोजगार झालेत. बरेचशे शिक्षक उदरनिर्वाहासाठी शेतीकामासाठी जाऊ लागले आहेत. सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर व शासनाचे नियम पाळू. शासनाने किमान पाच ते दहा विद्यार्थ्यांचा क्‍लास घेण्यास तरी परवानगी द्यायला हवी. 
-योगीता पाटील, संचालक, खासगी क्‍लास 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule kapadne corona virus private class open