कैदी लता भोईटे धुळे कारागृहात दाखल 

कैदी लता भोईटे धुळे कारागृहात दाखल 

धुळे ः जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाने 49 आरोपींना कैदेची शिक्षा सुनावली. यानंतर सहा आरोपी परस्पर श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे त्यांची महिन्यापासून जिल्हा कारागृहात कैदी म्हणून नोंदच झालेली नाही. या गंभीर स्थितीकडे "सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर आज आरोपी लता रणजित भोईटे जिल्हा कारागृहात दाखल झाल्या. 

न्यायालयीन शिक्षेतील उर्वरित पाच आरोपी विजय पंडितराव कोल्हे, साधना राधेश्‍याम कोगटा, अलका नितीन लढ्ढा, मीना अनिल वाणी, सुधा पांडुरंग काळे अद्याप जिल्हा रुग्णालयात असल्याने त्यांची जिल्हा कारागृहाला प्रतीक्षा आहे. 

शिक्षा मोजावी कशी? 
संबंधित सहा आरोपींनाही 31 ऑगस्टला कैदेची शिक्षा सुनावली गेल्यानंतर ते परस्पर उपचाराच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे त्यांची जिल्हा कारागृहाकडे कैदी म्हणून नोंदच झालेली नाही. या प्रकारास महिना झाला आहे. न्यायालयीन आदेशाचे हे उल्लंघन मानले जात असल्याने आणि सहा आरोपी परस्पर जिल्हा रुग्णालयात गेल्याने त्यांची शिक्षा मोजायची कशी, असा गंभीर प्रश्‍न जिल्हा कारागृह प्रशासनापुढे निर्माण झाला. 

रुग्णालयाची "चुप्पी' कायम 
या पार्श्‍वभूमीवर कारागृह प्रशासनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक, सहा आरोपींची देखरेख ठेवणाऱ्या डॉक्‍टरांकडे आरोपींच्या आजारासह उपचाराबाबत विचारणा केली. मात्र, रुग्णालय व्यवस्थापनाने अद्याप "हाताची घडी, तोंडावर बोट' ठेवणेच पसंत केले आहे. कारागृह प्रशासनासह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यास रुग्णालय व्यवस्थापन तयार नाही. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत काही काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे. 

डॉ. रामराजे संपर्काबाहेर 
वैद्यकीय अधिकारी व देखरेखीतील डॉक्‍टरांनी आरोपींशी संगनमत करून, अन्य कुठल्या तरी दबावाला बळी पडून सहा आरोपींना रुग्णालयात महिनाभर उपचारासाठी दाखल तर करून घेतले नाही ना, असा प्रश्‍न विविध स्तरावरून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात हिरे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एन. रामराजे यांना आज मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांचे दोन मोबाईल क्रमांक आहेत. पैकी एक क्रमांक दिवसभर "स्वीच ऑफ' होता. दुसरा क्रमांक ते "कट' करत होते. त्यामुळे त्यांची जनमानसातून उपस्थित विविध प्रश्‍नांवरची भूमिका समजू शकली नाही. 

सखोल चौकशीची मागणी 
दरम्यान, कैदेच्या शिक्षेतील आरोपी लता भोईटे या आज दुपारी तीनच्या सुमारास जिल्हा कारागृहात दाखल झाल्या आहेत. उर्वरित पाच आरोपींची जिल्हा कारागृहाला प्रतीक्षा आहे. त्यांच्या आजारासह उपचाराबाबत नेमकी स्थिती अधिष्ठाता डॉ. रामराजे यांच्याकडून समजू न शकल्याने संभ्रमावस्था कायम आहे. हतबल कारागृह प्रशासनाने वस्तुस्थितीदर्शक अहवाल जिल्हा न्यायालयास सादर केला आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. जळगाव घरकुल प्रकरणी जिल्हा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. सृष्टी निळकंठ यांनी 31 ऑगस्टला 49 आरोपींना शिक्षा सुनावली होती. यात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह 42 कैद्यांची नाशिक कारागृहात रवानगी झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com