esakal | धुळे एलसीबी पोलिसांनी हरियानाची टोळी पकडली
sakal

बोलून बातमी शोधा

Police Arrest

धुळे एलसीबी पोलिसांनी हरियानाची टोळी पकडली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे: एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून त्याचे क्लोनिंग करत कार्डधारकाच्या (ATM) खात्यातून पैसे काढणाऱ्या आंतरराज्य टोळीतील (Police Gang Arrest) चौघांना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने (एलसीबी) बेड्या ठोकल्या. टोळीतील एक अल्पवयीन आहे. एलसीबीने त्यांच्याकडून रोकडसह सुमारे साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा: चाळीसगावात पून्हा जोरदार पाऊस..तितूर नदीला सहाव्यांदा पुर


शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तसेच सायबर पोलिस ठाण्यामध्ये एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून बँक खात्यातून पैसे काढून फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल होत्या. याअनुषंगाने पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी एलसीबीला गुन्ह्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून ते उघडकीस आणण्याची सूचना दिली. एलसीबीने तक्रारींचा बारकाईने अभ्यास केला असता बहुतांश गुन्हे सकाळी घडल्याचे लक्षात आले. तसेच ज्या ठिकाणाहून पैसे काढले गेले, तेथील सीसीटिव्ही फुटेज मिळवून तपासणी केली. अशा प्रकारातील गुन्हेगार हरियानाच्या हिसारमधील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हेही वाचा: भुजबळांच्या नावाने सुनील झंवरच्या मुलास फोन; फसवणूकीचा गुन्हा दाखल


त्यातच शुक्रवारी (ता.१) हरियाना पासिंगची एचआर ८० डी ३९८२ या क्रमांकाची कार मालेगावकडून धुळ्याकडे येत असून त्यात गुन्हेगार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. याअनुषंगाने एलसीबीने चाळीसगावरोड चौफुली येथे सापळा रचला. कार थांबवून त्यातील चौघांना ताब्यात घेतले. एलसीबीच्या कार्यालयात आणून त्यांची चौकशी केली. विजयकुमार पालाराम राजपूत, सुनीलकुमार धुपसिंग राजपूत, शिवकुमार चंदकिशोर शर्मा, अशी तिघांची नावे असून त्यांचा एक साथीदार अल्पवयीन आहे. त्यांच्याकडून एक लाख ३० हजार ३०० रुपयांची रोकड, सात मोबाईल, आठ लाखांची कार, सहा हजार रुपये किमतीचे एटीएम कार्ड, क्लोन करण्याचे मशिन, तीन हजार रुपये किमतीचे एटीएम कार्ड स्वाईप मशिन आणि ६६ एटीएम कार्ड, असा ९ लाख ५९ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

हेही वाचा: जळगावः तरुणांना हटकल्याचा आला राग..चक्क पोलिसाला बेदम मारहाण


संशयितांनी पंचवटी टॉवरजवळच्या एचडीएफसीच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून त्याच्या खात्यातील तीन लाख ८० हजार रुपये काढल्याची कबुली दिली. तसेच धुळ्यात वेगवेगळ्या पाच ठिकाणी एटीएममधून पैसे काढल्याचे त्यांनी कबूल केले. या संशयितांनी नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर, यवतमाळ, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाना, उत्तर प्रदेश, दिल्ली या ठिकाणी एटीएम कार्डधारकांना हातचलाखीचा हिसका दाखवला. पुढील तपासासाठी संशयितांना देवपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक अधिकारी प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, पोलिस कर्मचारी संजय पाटील, प्रकाश सोनार, कुणाल पानपाटील, संदीप सरग, उमेश पवार, रवीकिरण राठोड विशाल पाटील, पंकज खैरमोडे, सुनील पाटील, मनोज महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

loading image
go to top