esakal | पुलाअभावी नदीतून जीवघेणा प्रवास 
sakal

बोलून बातमी शोधा

river without a bridge

धामणगावची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. बोरी नदीच्या दुसऱ्या काठाला अधिकतर शेती क्षेत्र आहे. नदीवर पूल नसल्याने शेतकरी, मजूरांना नदी पात्रातून ये- जा करत शेत गाठावे लागते.

पुलाअभावी नदीतून जीवघेणा प्रवास 

sakal_logo
By
रवींद्र देवरे

धामणगाव (धुळे) : विकसनशील जिल्ह्याचा बोलबाला असला तरी धामणगाव (ता. धुळे) येथील ग्रामस्थांना पुल नसल्याने शेतीसाठी अक्षरशः रोज नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नदीच्या दुसऱ्या काठाकडे ७० टक्के शेती क्षेत्र असल्याने जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ कामासाठी जातात. केवळ गटातटाच्या राजकारणामुळे धामणगावची पुलाची समस्या सुटत नसल्याने रोष व्यक्त होतो. या स्थितीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेते, अधिकाऱ्यांची संवेदना केव्हा जागृत होईल हा प्रश्‍न आहे. 

सतत आणि दमदार पावसामुळे यंदा बोरी नदीला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पूर येत आहे. अशात ७० टक्क्यांहून अधिक शेती क्षेत्र नदीपलीकडे असल्याने धामणगावच्या शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना पूलाअभावी रोजच प्रवासाची कसरत करावी लागते. पूर स्थितीमुळे दुग्धोत्पादन, पोल्ट्री व्यवसाय, शेळीपालनावर परिणाम झाला आहे. शेतात मजूरच पोहोचत नसल्याने पिकांची हानी होत आहे. गेल्या वर्षी शेतकरी शरद पाटील नदी ओलांडून येत असताना पाण्याचा लोंढा येऊन ते वाहून गेल्याने मृत्यू पावले. प्रत्येक शेतकरी जीवावर उदार होऊन पाण्यातूनच एकमेकांचा हात धरत, साखळी करत वाट काढत शेत गाठतात. 

धामणगावची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. बोरी नदीच्या दुसऱ्या काठाला अधिकतर शेती क्षेत्र आहे. नदीवर पूल नसल्याने शेतकरी, मजूरांना नदी पात्रातून ये- जा करत शेत गाठावे लागते. अवजारे नेण्यासाठी बैलगाडी, अन्य वाहनांचा वापर करताना ते नदीतूनच न्यावे लागतात. नदीला पाणी असल्यास शेतकऱ्यांची कामे ठप्प होतात. नदीत पाण्याचे प्रमाण वाढल्यास मार्ग बंद होतो. काही दिवसांपासून पुराचे प्रमाण वाढल्याने नदीपलीकडे जाण्यास शेतकऱ्यांना मार्गच राहिलेला नाही. 

शेतीपूरक व्यवसाय ही ठप्प 
येथील अनेक शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादन, पोल्ट्री फार्म, गोट फार्म सुरू केले. पुलाअभावी या व्यवसायावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. यासंदर्भात नोव्हेंबर २०१६ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी, खासदार सुप्रिया सुळे, मंत्रीगण, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्यांना निवेदन दिले गेले. रात्री- अपरात्री नदीचे पाणी वाढल्यास ते गावात शिरते. यात अनेकदा पशुधन वाहून जाते. त्यामुळे जीवित व वित्त हानी होते. या पार्श्वभूमीवर लवकर पूल बांधावा, काठालगत संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी आहे. 
 
अनेक गावांचा संपर्क खंडित 
धामणगाव येथून बोरी नदीपात्रातून परिसरातील खोरदड, मोरदड, चांदे, मोरदड तांडा, करमाळ आदी गावांना जोडणारा रस्ताही आहे. मात्र, नदीचे पाणी वाढल्यास रस्ता ठप्प होतो. गटातटाच्या राजकारणामुळे पुलाचा प्रश्न शासन दरबारी भिजत पडला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top