पोलिस बंदोबस्तात, तर चोरटे घरफोड्यांत व्यस्त 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

"कोरोना'च्या संकटकाळात चोरट्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवपूर परिसरात तीन दिवसांपूर्वी धाडसी चोरीत लाखोचा ऐवज घरातून लंपास केला. त्याचबरोबर घरातील रोकड, ऐवजसह मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. 

धुळे : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोरी-घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातून लाखोंचा ऐवज लंपास झाला. "लॉकडाउन" काळात पोलिस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त असून, त्याचाच फायदा घेत बंद असलेली घरे, दुकाने चोरट्यांनी लक्ष्य केली आहे. शहरातील देवपूर, पश्‍चिम देवपूरसह शहरातील बाजारपेठ, साक्री रोड परिसरात लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रकार घडले आहेत. "कोरोना'च्या संकटकाळात चोरट्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवपूर परिसरात तीन दिवसांपूर्वी धाडसी चोरीत लाखोचा ऐवज घरातून लंपास केला. त्याचबरोबर घरातील रोकड, ऐवजसह मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. 

दोंडाईचात दुकान फोडले 
दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील अहिल्याबाई शॉपिंग सेंटरमध्ये व्यावसायिक जगदीश देविदास गिरासे (वय 42, रा. हुडको कॉलनी, दोंडाईचा) यांचे साई मोबाईल इलेक्‍ट्रिक दुकान आहे. शनिवारी (ता.30) सकाळी अकरानंतर दुकान बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास दुकानात चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी टॅमीच्या सहाय्याने शटर उचकावले. दुकान फोडून 20 हजारांची रोकड लंपास केली. नरडाणा हद्दीतही चोरीचे प्रकार वाढले आहेत. 

निमशहरी भागात बाजारपेठ लक्ष्य 
चोरट्यांकडून शहरी व निमशहरी भागातील बाजारपेठांसह व्यापारी संकुलातील दुकाने लक्ष्य केले जात आहेत. "लॉकडाउन'मुळे अनेक दिवसांपासून दुकाने सातत्याने बंद आहेत. वर्दळ नसल्याने दुकानमालकांना दुकानाकडे जाणे शक्‍य होत नाही. त्यात इलेक्‍ट्रॉनिक, मोबाईल दुकानांचासह जीवनावश्‍यक वस्तू नसलेल्या दुकानांचा अधिक समावेश आहे. त्यापाठोपाठ बंद घरे असल्याने त्याचाही लाभ चोरट्यांकडून घेतला जात आहे. काही घरमालक बाहेरगावी अडकल्यानेही ती घरे चोरट्यांनी फोडल्याचे उघड होत आहेत. 

पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज 
बाजारपेठेसह परिसरात सायंकाळनंतर, रात्री वर्दळ नसल्याने चोरटे त्याचा फायदा घेत आहेत. चोरीनंतर पसार होण्यासही चोरट्यंना आयतीच संधी मिळत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. काही दिवसांत शहरी व निमशहरी भागातील चोरटे सक्रिय झाल्याने पोलिसांकडून रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. बंदोबस्ताशिवाय अन्य भागातही गस्त सुरू ठेवावी. संशयास्पद व मध्यरात्री शहरातून जाणाऱ्या वाहनांचीही कसून चौकशी करावी. नाकेबंदीही केल्यास चोरट्यांना काहीअंशी वचक बसण्यास मदत होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule lockdown police on duty and house roberry continue