मनसेने ठोकले वीज कंपनी कार्यालयाला कुलूप

निखील सुर्यवंशी
Friday, 14 August 2020

वाढीव वीजबिलांप्रश्‍नी राज्यातील तिकडी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप मनसेने केला. वीजबिलात त्वरित सूट मिळावी व जनतेला दिलासा द्यावा.

धुळे : लॉकडाउनच्या काळात ग्राहकांना वाढीव वीजबिले दिल्याप्रश्‍नी ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेण्याबाबत निवेदने दिली, तरी त्याचा काहीही उपयोग न झाल्याने या प्रकाराचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी (ता. १३) येथील साक्री रोडवरील वीज कंपनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. वाढीव वीजबिलांप्रश्‍नी पर्याय काढला नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला. 

लॉकडाउनच्या काळात वीज कंपनीने ग्राहकांना वाढीव वीजबिले दिली. ही वीजबिले माफ करावीत, अशी मागणी करणारी निवेदने १७ जूनला मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांना ई-मेल केली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मात्र, वीज कंपनी अव्वाच्या सव्वा बिले देऊन ते बिल भरण्याची सक्ती करत आहे. ऊर्जामंत्री श्री. राऊत यांनी वीजबिलात २० ते ३० टक्के सूट देण्याबाबत विचार केला जात असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात काहीही झाले नाही.

वाढीव वीजबिलांप्रश्‍नी राज्यातील तिकडी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप मनसेने केला. वीजबिलात त्वरित सूट मिळावी व जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मनसेने केली. मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, संदीप जडे, महानगराध्यक्ष संजय सोनवणे, उपमहानगरप्रमुख संतोष मिस्त्री, राजेश दुसाने, साहील खान, अविनाश देवरे, नीलेश गुरव, दीपक बच्छाव, कुणाल लोंढे, हेमंत हरणे, तुषार चौधरी, बापू ठाकूर, अनिल खेमनार, जगदीश गवळी, सुनील बाविस्कर, विष्णू मासाळ, संजय सोनार आदींनी हे आंदोलन केले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule maharashtra navnirman sena workers locked the MSEDCL office