चार हजार घेताच अभियंत्‍याला बसला शॉक, काय आहे प्रकार वाचा

भरत बागुल
Thursday, 3 September 2020

पिंपळनेर येथील एका व्यावसायिकाने जुने घर विकत घेतले. त्या घरात त्यांच्या नावाचे मीटर घेण्यासाठी संबंधित सहाय्यक अभियंता माळी यांच्याकडे अनेकदा चक्रा मारूनही काम होत नव्हते. संबंधित अधिकाऱ्याने नवीन मीटरच्या कनेक्शनसाठी पाच हजार रुपयाची मागणी केली होती.

पिंपळनेर (धुळे) : येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संजय माळी यांना नवीन मीटरच्या कनेक्शन साठी चार हजार रुपयाची लाच घेताना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. पिंपळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पिंपळनेर येथील एका व्यावसायिकाने जुने घर विकत घेतले. त्या घरात त्यांच्या नावाचे मीटर घेण्यासाठी संबंधित सहाय्यक अभियंता माळी यांच्याकडे अनेकदा चक्रा मारूनही काम होत नव्हते. संबंधित अधिकाऱ्याने नवीन मीटरच्या कनेक्शनसाठी पाच हजार रुपयाची मागणी केली होती. तडजोडी अंती ते चार हजार रुपये ठरले. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित व्यावसायिकाने धुळे येथील लाचप्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध सापळा लावण्यात आला. त्‍यानुसार आज दुपारी चार वाजेच्या सुमारास संजय माळी आपल्या कार्यालयात पैसे स्वीकारताना लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. याबाबतीत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.

हे तर होणारच होते
अधिकारी संजय माळी भ्रष्‍ट्राचारी अधिकारी म्हणूनच पिंपळनेर गावात ओळखले जात होते. परंतु लोकांचे काम असल्याने कोणत्याही व्यक्ती त्यांच्या विरोधात तक्रार करत नव्हते. घटना घडल्यानंतर गावात माळी हे कोणतेही काम करण्यासाठी पैशांचीच मागणी करत यामुळे ते एक ना एक दिवस पकडलेच जाणार असल्‍याची चर्चा सुरू होती.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule mahavitaran engineer four thousand Bribery lcb trap