धुळे जिल्हा मुख्य टपाल खात्यातील अधिकारीही "कोरोना' बाधित 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

टपाल खात्यातील येथील सहाय्यक अधीक्षक तापाने आजारी होते. त्यांची टपाल खात्याच्या आवारात मुक्कामासाठी खोली आहे. तेथे ते वास्तव्यास असतात. ताप असल्याने त्यांना इतर कर्मचाऱ्यांनी तपासणीसह घरी जाण्याचा सल्ला दिला.

धुळे : धुळे शहरात बारापत्थर रोडवर जिल्ह्याचे मुख्य टपाल खाते आहे. तेथील सहाय्यक अधीक्षक जळगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे येथील टपाल खात्यातील कर्मचारी मात्र चिंतेत सापडले आहेत. सर्वांची तपासणी करावी, त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

हेपण वाचा - धुळ्यात चौफेर पसरतोय "कोरोना'

टपाल खात्यातील येथील सहाय्यक अधीक्षक तापाने आजारी होते. त्यांची टपाल खात्याच्या आवारात मुक्कामासाठी खोली आहे. तेथे ते वास्तव्यास असतात. ताप असल्याने त्यांना इतर कर्मचाऱ्यांनी तपासणीसह घरी जाण्याचा सल्ला दिला. ते अमळनेर- चोपडा (जि. जळगाव) येथे मूळ गावी गेले. तेथून तपासणीला गेल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. ते जळगाव येथे उपचार घेत आहेत. 
या प्रकारामुळे टपाल खात्यातील इतर कर्मचारी चिंतेत आहेत. त्यातील दहा ते अकरा कर्मचाऱ्यांना प्रसारमाध्यमांनी विचारणा केल्यावर टपाल खात्याने होम क्वारंटाइन केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात खातरजमा करण्याचा प्रयत्न केला असता टपाल अधीक्षकांनी बोलणे टाळले. टपाल खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. या खात्याचे अधीक्षकही नुकतेच औरंगाबादहून परतल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात चौकशीसह योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा पोलिस प्रशासनाने सांगितले. 
टपाल खात्यात काही केंद्रीय, राज्यस्तरीय योजनांचा अनुदानीत निधी येतो. "कोरोना'च्या कालावधीत गरीब लाभार्थी असा लाभ घेण्यासाठी टपाल खात्यात येतात व गर्दी करतात. अशा वेळी सहाय्यक अधीक्षकांना कोरोनाची धुळ्यात लागण झाली किंवा कसे? याबाबत चौकशी केली जावी, अशी मागणी आहे. प्रसंगी त्यांच्या संपर्कातील टपाल खात्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule main post officer corona Interrupted