esakal | मराठा आरक्षण आंदोलन; धुळ्यात खासदार, आमदारांचा पाठिंबा 
sakal

बोलून बातमी शोधा

maratha aarkshan aandolan

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्‍नी याचिकेवर स्थगिती दिली आहे. ती उठावी, त्यासाठी दबाव गट निर्माण करून यशस्वी कायदेशीर लढाई केली जावी यासाठी विविध स्वरूपाच्या आंदोलनाचा निर्णय येथील जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे.

मराठा आरक्षण आंदोलन; धुळ्यात खासदार, आमदारांचा पाठिंबा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणप्रश्‍नी शुक्रवारपासून (ता. २) आमदार, खासदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार झालेल्या आंदोलनात आमदार, खासदार सहभागी झाले. यात घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने अध्यादेश काढण्याची मागणी आंदोलकांनी केली. आमदार डॉ. फारूक शाह यांनी आंदोलकांवर पुष्पवृष्टी करत लक्ष वेधले. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्‍नी याचिकेवर स्थगिती दिली आहे. ती उठावी, त्यासाठी दबाव गट निर्माण करून यशस्वी कायदेशीर लढाई केली जावी यासाठी विविध स्वरूपाच्या आंदोलनाचा निर्णय येथील जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. यात प्रथम शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. ढोल बजाव आंदोलन करत मोर्चाने लक्ष वेधले. 

आवाज उठविणार 
आंदोलनाला आमदार, खासदारांनी सक्रिय पाठिंबा दिला. केंद्रीय माजी मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे आंदोलनात सहभागी झाले. पक्षीय जोडे बाजूला ठेवून मराठा समाजाच्या न्याय मागणीसाठी लोकसभेत आवाज उठवू, अशी ग्वाही डॉ. भामरे यांनी दिली. राज्यात मराठा समाज ३५ टक्के आहे. त्यातील ८० टक्के समाज मागास आहे. त्यांची आरक्षणाची मागणी रास्त आहे. त्यामुळेच आंदोलनाला पाठिंबा आहे. आमदार डॉ. शाह यांनी पुष्पवृष्टी करत आंदोलकांचे स्वागत केले आणि मागणीला पाठिंबा दिला. नंतर आमदार कुणाल पाटील आंदोलनात सहभागी होत आणि त्यांनी ढोल वाजवीत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. आरक्षणासाठी मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून लढू, असे आमदार पाटील म्हणाले. खासदार, आमदारांनी आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आवाज उठवावा, अशी अपेक्षा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज मोरे यांनी व्यक्त केली. निंबा मराठे, साहेबराव देसाई, चंद्रशेखर भदाणे, शीतल नवले, प्रा. बी. ए. पाटील, प्रदीप जाधव, नाना कदम, राजेंद्र मराठे, प्रफुल्ल माने, समाधान शेलार, अशोक सुडके, ऋषी ठाकरे, राजेंद्र ढवळे, संदीप सूर्यवंशी, हेमलता हेमाडे, गायत्री लगडे, मिना पाटील, आशा पाटील, प्रतिभा सोनवणे, नीलेश काटे, वीरेंद्र मोरे, श्‍याम निरगुडे, अशोक तोटे आदी सहभागी झाले. 

loading image