स्वयंपाक केला नाही म्हणून  त्याने "वाहक' पत्नीचा चक्क... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

योगेशने पत्नी कविताशी वाद घातला. शिवीगाळ, दमदाटी करून तिला मारहाण केली. केस ओढून ठार मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच हा वाद थांबला नाही. योगेशने सॅनिटायझरची बाटली कविताच्या तोंडावर फेकली.

धुळे ः केवळ स्वयंपाक केला नाही या किरकोळ कारणाने एका नोकरदार पतीने आपल्या नोकरदार पत्नीच्या तोंडावर सॅनिटायझरची बाटली फेकली...हे सॅनिटायझर नाका-तोंडात गेल्याने तिला चक्कर आली. एवढ्यावरच हे पती महाशय थांबले नाहीत तर पत्नीला थेट ओढणीने गळा दाबून ठार मारण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी येथील आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

धुळे शहरातील पारोळा रोडवरील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रासमोर पशुसंवर्धन विभागाचे निवासस्थान आहे. तेथे राज्य परिवहन महामंडळातील वाहक कविता पती योगेश शिवाजी शिंदे (वय 37) याच्यासोबत वास्तव्याला आहेत. योगेश शिंदे पशुसंवर्धन विभागात नोकरीला आहेत. दरम्यान, काल (ता. 11) दुपारी दोनच्या सुमारास स्वयंपाक केला नाही, या किरकोळ कारणावरून योगेशने पत्नी कविताशी वाद घातला. शिवीगाळ, दमदाटी करून तिला मारहाण केली. केस ओढून ठार मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच हा वाद थांबला नाही. योगेशने सॅनिटायझरची बाटली कविताच्या तोंडावर फेकली. त्यामुळे बाटलीतील सॅनिटायझर कविताच्या डोळे, नाका-तोंडात गेल्याने तिला चक्कर आली. एवढ्यावरही हे भांडण थांबले नाही. योगेशने ओढणीने पत्नी कविताचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कविता शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित योगेश शिंदे याच्याविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक एम. जे. सय्यद तपास करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule married women beaten by her husband