esakal | धुळ्याचा महापौर ओबीसीच;सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

धुळ्याचा महापौर ओबीसीच;सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

sakal_logo
By
टीम ई सकाळ


धुळे : महापालिकेच्या स्थापनेपासून (Dhule Municipal Corporation) आरक्षण नियमावलीमुळे एससी संवर्ग महापौरपदाच्या (Mayor) संधीपासून दूर राहिला, त्यामुळे या पदासाठी निघालेले ओबीसी आरक्षण रद्द करावे, अशा मागणीची याचिका स्थायी सभापती संजय जाधव यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. त्यावर खंडपीठाने ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द करावे, असा आदेश दिला. यास आव्हान देणारी याचिका मान्य करत खंडपीठाचा आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) बुधवारी फेटाळला. त्यामुळे येथील महापौर ओबीसी संवर्गाचाच असेल, यावर शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचा: चाळीसगावच्या पूरग्रस्तांना पहिली मदत खाकीची..!

खंडपीठाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात भाजपचे नगरसेवक प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, संजय पाटील यांनी धाव घेतली होती. ते महापौरपदाचे दावेदार आहेत. तत्पूर्वी, महापौरपदापासून एससी संवर्ग वंचित असून, न्यायासाठी सभापती जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. राज्य शासनाने १३ नोव्हेंबर २०१९ ला महापौरपदासाठी ओबीसी संवर्गाचे आरक्षण जाहीर केले. मात्र, २००३ ला महापालिकेच्या स्थापनेपासून येथील महापौरपद खुले, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जमातीसाठीच राखीव ठेवले होते. सद्यःस्थितीत महापालिकेत ७४ नगरसेवक असून, त्यातील पाच नगरसेवक अनुसूचित जाती संवर्गाच्या आरक्षित प्रभागातून निवडून आले. त्यामुळे महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित करावे, अशी मागणी सभापती जाधव यांनी केली होती.

हेही वाचा: गाय, म्हशीच्या दूध खरेदीदरात वाढ; जळगाव जिल्हा दूध संघाचा निर्णय


भाजपमध्ये चुरस वाढली
या पार्श्‍वभूमीवर खंडपीठाने महापौरपदाचे ओबीसी आरक्षण रद्दबातल केले. तसेच, तरतुदीनुसार नव्याने महापौरपदाचे आरक्षण काढण्याचा आदेश दिला होता. याविरोधात श्री. कर्पे, सौ. चौधरी, श्री. पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यात बुधवारी कामकाजावेळी खंडपीठाचा आदेश फेटाळला गेल्याने महापौरपदाचा उमेदवार आता ओबीसी संवर्गाचाच राहील, असे स्पष्ट झाले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सचिन पाटील, तर श्री. कर्पे, सौ. चौधरी यांच्यातर्फे अ‍ॅड. मीनाक्षी अरोरा, अ‍ॅड. सुधांशू चौधरी, अ‍ॅड. नितीन चौधरी, अ‍ॅड. परमेश्‍वर चौधरी यांनी काम पाहिले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महापौरपदासाठी मनपातील सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांत चुरस वाढली आहे. यात प्रबळ दावेदार म्हणून श्री. कर्पे, सौ. चौधरी, श्री. पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. शिवाय वालीबेन मंडोरे, देवेंद्र सोनार स्पर्धेत आहेत. महाविकास आघाडीकडून माजी महापौर कल्पना महाले, विद्यमान विरोधी पक्षनेते कमलेश देवरे उमेदवार असू शकतील. महापालिकेत बहुमताने भाजपची सत्ता असल्याने महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याविषयी उत्कंठा असेल. सुप्रीम कोर्टाचे निकालपत्र हाती आल्यावर महपौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल, असे प्रशासनाने सांगितले.

loading image
go to top