एसीपीएम कॉलेज, हॉस्पिटलचा संपर्क तुटला; प्रवाहित सांडव्याने मार्ग अडवल्यामुळे शस्त्रक्रियाच रद्द 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

धुळे : साक्री रोडवरील मोराणे, हरण्यामाळ परिसर तसेच नकाणे तलाव क्षेत्रात समाधानकारक पावसामुळे साक्री रोड ते हरण्यामाळला जाणाऱ्या मार्गावर तलावाचा सांडवा वाहू लागला. त्यामुळे या मार्गावरील जवाहर फाउंडेशनचे एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा संपर्क तुटला. त्यामुळे रुग्ण, गर्भवतींचे हाल झाले. महाविद्यालय, डॉक्‍टर, कर्मचारी पोहचू न शकल्याने अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. 

धुळे : साक्री रोडवरील मोराणे, हरण्यामाळ परिसर तसेच नकाणे तलाव क्षेत्रात समाधानकारक पावसामुळे साक्री रोड ते हरण्यामाळला जाणाऱ्या मार्गावर तलावाचा सांडवा वाहू लागला. त्यामुळे या मार्गावरील जवाहर फाउंडेशनचे एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा संपर्क तुटला. त्यामुळे रुग्ण, गर्भवतींचे हाल झाले. महाविद्यालय, डॉक्‍टर, कर्मचारी पोहचू न शकल्याने अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. 
नकाणे तलाव परिसरात शुक्रवारी (ता.4) जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही तासांत तलावाला जोडणाऱ्या सांडव्याची पातळी वाढली व तो ओसंडून वाहू लागला. पाणी रस्त्यावर आले. मोठा प्रवाह जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या भिंतीलगत मार्गावर आला. महाविद्यालयालगत रस्ता आधीच पावसाने खचल्याने गंभीर स्थिती झाली. मध्यरात्रीनंतर अनेक वाहने, डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, 108 रुग्णवाहिका, रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात अडकून पडले. 
 
मागणीची पूर्तता व्हावी 
दुसरीकडे शनिवारी नेहमीप्रमाणे रुग्णसेवेसाठी तत्पर डॉक्‍टर, नर्स, आरोग्य कर्मचारी अडकून पडल्याने अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. ऑक्‍सिजन सिलिंडर, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्यही या रुग्णालयात संबंधितांना पोचवता आले नाही. रुग्णालय व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन तसेच जलसंपदा विभागाला पत्र देऊनही ही समस्या दूर झालेली नाही. या मार्गावरील मोरीचे बांधकाम करून रस्ता उंच करण्याची मागणी आहे. त्यामुळे हरण्यामाळचाही धुळे शहराशी संपर्क तुटला. एसीपीएम रुग्णालयात "नॉन कोविड' सर्वसामान्य रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु, रस्ताच बंद झाल्यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, युवासेना जिल्हाप्रमुख ऍड. पंकज गोरे, राजू पाटील, रवी काकड, भटूआप्पा गवळी आदींनी घटनास्थळी पाहणी केली. श्री. माळी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी संपर्क साधत उपाययोजनांची मागणी केली. 
 
आमदारांची प्रशासनाकडे मागणी 
जवाहर फाउंडेशनचे पदाधिकारी तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, तहसीलदार, जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण दोडामणी आदींनी स्थितीची पाहणी केली. आमदार पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला नेमकी अडचण लक्षात आणून दिली व तोडगा काढण्याची मागणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule mcpm medical collage sandwa water entry and opration stop