जिल्हाधिकारी "अलर्ट'...120 बेडला ऑक्‍सिजन पॉइंट! 

dhule medical collage
dhule medical collage

धुळे : कोरोना विषाणूचा संसर्ग खंडित होत नसल्याने, दोन महिन्यांतील "लॉक डाउन', संचारबंदीमुळे घरात कोंडून असलेल्या नागरिकांच्या संयमाचा बांध सुटत असला तरी या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी तथा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा व नियंत्रण समितीचे अध्यक्ष संजय यादव "अलर्ट' आहेत. त्यांनी आणि हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाने संभाव्य स्थितीशी मुकाबला करण्यासाठी तयारी राहण्याचे ठाणले असून, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात 120 बेडला ऑक्‍सिजन पॉइंट असावे, असा कृती आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू होत आहे. 

शेजारचे अमळनेर, मालेगाव, जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांपेक्षा धुळे शहर व जिल्ह्याची स्थिती तुलनेत नियंत्रणात आहे. असे असले तरी गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे "अलर्ट' जिल्हाधिकारी यादव यांनी हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रतिनिधींची उपाययोजना निश्‍चित करण्याबाबत नियमित बैठकीवर भर दिल आहे. गेल्या महिन्यात महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आणखी 30 बेडला ऑक्‍सिजन पॉइंट वाढवावे, असे निर्धारित झाले होते. मात्र, काही दिवसांत कमी- अधिक फरकाने "कोरोना'बाधितांची संख्या वाढताना दिसत असल्याने जिल्हाधिकारी यादव यांनी रूग्णालयात 120 बेडला ऑक्‍सिजन पॉइंट असावे, अशी सूचना दिली. यादृष्टीने महाविद्यालय व रुग्णालय व्यवस्थापनाने तयारी सुरू केली असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल. नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अंमलबजावणी केली जाईल. 

सुसज्ज बेडची तयारी 
यासंदर्भात रुग्णालयाचे नोडल ऑफिसर तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले, की रुग्णालयात 33 बेडला ऑक्‍सिजन पॉइंट आहे. भविष्यात रुग्णवाढीची शक्‍यता लक्षात घेऊन आणखी असे 30 बेड व आता एकूण 120 बेड ऑक्‍सिजन पॉइंटने सुसज्ज करण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी यादव आणि अधिष्ठाता डॉ. सापळे यांच्या सूचनेनुसार ही अंमलबजावणी केली जात आहे. जिल्हा सर्वोपचार रुग्णालय 206 बेडचे सुसज्ज कोविड डेडिकेटेड रुग्णालय असावे, अशी सूचना आहे. त्यादृष्टीने संघटितपणे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णालयाची वाटचाल सरासरी अडीचशे बेडवरून साडेपाचशे बेडपर्यंत असणार आहे. जेणे करून जिल्ह्यासह सीमेलगतच्या रुग्णांचा भार रुग्णालय आणखी सक्षमपणे सोसू शकेल. 

बस्स! प्रत्येकाने फक्त साथ द्यावी... 
जानेवारीपासून मेपर्यंत हिरे महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाने कमी मनुष्यबळ असताना "कोरोना'शी मोठा मुकाबला केला आहे. आहे ते सर्व सहकारी डॉक्‍टर, कर्मचारी अहोरात्र, अथक जिवाची बाजी लावून लढत आहेत. तीन "शिफ्ट'मध्ये ते काम करत आहेत. रूग्णसेवेला प्राधान्य देत आहेत. त्यांच्या कार्याला तोड नाही. "कोरोना'विरुद्धची लढाई मोठी असल्याने ही ताकद, हिंमत आणि मनोधैर्य वाढीसाठी, टिकून राहण्यासाठी प्रत्येक रुग्ण, नातेवाइकाने काही उणिवा पदरात घेऊन साथ द्यावी, सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी, अधिष्ठाता आणि इतर सहकारी यंत्रणांच्या सहकार्याने "कोरोना'वर आपण विजय मिळवू, असा विश्‍वास डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com