आमदारांबाबत वादग्रस्त `पोस्ट`; साक्रीसह तालुक्यात कडकडीत बंद 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

पांझरा कान बचाव समिती’ नामक व्हॉट्सअप ग्रुपवर आमदार मंजुळा गावित यांच्याविषयी दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह, अवमानजनक पोस्ट व्हायरल झाली. ती देगाव येथील शिक्षक जगदीश अकलाडे याने केली. त्याचा निषेध करत अकलाडेला ग्रुपमधून काढले.

साक्री (धुळे) : साक्री तालुक्यातील महिला आमदारांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अवमानजनक पोस्ट व्हायरल करणाऱ्या देगाव येथील शिक्षकाचा सर्व स्तरातून शुक्रवारी (ता. ९) तीव्र निषेध झाला. यासंदर्भात झालेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यावसायिकांसह नागरिकांनी साक्री शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळला. दोषी शिक्षकाला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी आमदार समर्थक व विविध पक्ष, संघटनांनी केली. 
‘पांझरा कान बचाव समिती’ नामक व्हॉट्सअप ग्रुपवर आमदार मंजुळा गावित यांच्याविषयी दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह, अवमानजनक पोस्ट व्हायरल झाली. ती देगाव येथील शिक्षक जगदीश अकलाडे याने केली. त्याचा निषेध करत अकलाडेला ग्रुपमधून काढले. त्याचा तत्काळ शोध घेऊन अटक करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने केली. यासंदर्भात शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आमदार मंजुळा गावित, डॉ. तुळशीराम गावित उपस्थित होते. बैठकीत घडलेल्या संतप्त प्रकाराचा निषेध झाला. 

शिक्षक फरारीच
महिला वर्गाचा अवमान करणारा शिक्षक फरारी झाला असून, तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला संरक्षण देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन महाविकास आघाडीने तहसीलदार प्रवीण चव्हाणके, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना दिले. माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी. एस. अहिरे, गटनेते ज्ञानेश्वर नागरे, नगराध्यक्ष अरविंद भोसले, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती नरेंद्र मराठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य सुरेश सोनवणे, सरचिटणीस प्रा. नरेंद्र तोरवणे, जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी, नगरसेवक सुमित नागरे, ॲड. शरद भामरे, काँग्रेस कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, शहराध्यक्ष सचिन सोनवणे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश शिंदे, शहराध्यक्ष प्रज्योत देसले, शिवसेना महिला आघाडी संघटक कविता क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ता जोशीला पगारिया, डॉ. दिलीप चोरडिया, अक्षय सोनवणे, नंदू खैरनार, सुभाष देसले, दीपक काकुस्ते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भुपेश शहा, शहरप्रमुख बंडू गिते, बाळा शिंदे, किशोर वाघ, अक्षय सोनवणे, प्रफुल्ल नेरे, संभाजी अहिरराव, विजय भामरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार समर्थक, शिवसेना तसेच विविध आदिवासी संघटनांकडून साक्री शहरासह तालुका बंदची हाक देण्यात आली होती. त्यास सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सर्वत्र शांततेत बंद पाळला. त्यामुळे शहरासह तालुक्यातील उलाढाल ठप्प झाली होती. 

दोषी शिक्षकाचा माफिनामा... 
सोशल मीडियावर घडलेला प्रकार निंदनीय, निषेधार्ह आहे. कुठल्याही महिलेविषयी अनुद्‌गार काढणे चुकीचे आहे. घडलेल्या प्रकारानंतर कुणीही वाद वाढवू नये. सर्वांनी शांतता राखावी. संबंधित शिक्षकाने स्वतःहून पोलिसांसमोर हजर होत माफीनामा दिला आहे. यापुढे अशी चुक होता कामा नये, या विषयावर पडदा टाकावा, अशी भूमिका आमदार मंजुळा गावित यांनी मांडली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule mla social media controversial post impact