esakal | मनपाचे भूखंड परस्पर विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा 
sakal

बोलून बातमी शोधा

मनपाचे भूखंड परस्पर विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा 

धुळे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक शासकीय भूखंड शासकीय कर्मचा-यांना हाताशी धरून भूखंड माफिया गैरप्रकाराने खरेदी- विक्री करतात व त्यातून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करतात.

मनपाचे भूखंड परस्पर विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा 

sakal_logo
By
रमाकांत गोदराज

धुळे  ः शहरातील मालेगाव रोडवरील महापालिकेच्या भूखंडाची परस्पर विक्री केल्याप्रकरणी एसआयटी चौकशी करावी, संबंधितांना मोक्का लावावा अशी मागणी महापालिका स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे तसेच भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस निनाद पाटील यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. या भूखंड विक्रीच्या प्रकरणात महापालिकेच्या नगररचना विभागातील, भूमापन कार्यालयातील अधिकारी सहभागी असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. 

महानगरपालिका हद्दीतील मालेगांव रोडवरील सिटी सर्व्हे नंबरमधील ४८३/२/अ मधील मंजूर अभिन्यास नं. २६ धुळे मनपा २५ जुलै २०१९ नुसार ६२१ चौरस मीटर क्षेत्र नियमाप्रमाणे ओपन स्पेससाठी आरक्षित आहे. अभिन्यासास तात्पुरती मंजुरी देण्यात आलेली असून किशोर बाफना यांनी सिटी सर्वेहच्या क्षेत्रात फेरफार करून नवीन सिटीएस मिळकत पत्रिका उघडली व महापालिकेची कोटयावधीची जागा ७ नोव्हेंबर २०१९ व १५ जानेवारी २०२० ला परस्पर विक्री केल्याचे कागदपत्रांवरून दिसते. तात्पुरता अभिन्यास मंजूर असताना प्लॉट विक्री करता येत नाही. महापालिकेने अभिन्यायस मंजुरी दिली होती मात्र तरीही नगर भूमापन अधिकारी कार्यालयाने ओपन स्पेससंबंधित प्रतिवादीला नोटीस न देता सिटीएस ६८००/३ लावून घेतल्याचे श्री. बैसाणे व श्री. पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

अधिकारी सहभागी 
या भूखंड विक्री प्रकरणात महापालिकेच्या नगररचना विभाग व भूमापन कार्यालयातील अधिकारी सहभागी असल्याचा गंभीर आरोप करून याप्रकरणी एसआयटी चौकशी करावी, संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा. संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरू असून अभिन्यास मंजूर करणाऱ्या इंजिनिअरचे लायसन्स रद्द करावे, मनपा मालकीची संबंधित जागा ताब्यात घेऊन दोषींवर मोक्का लावावा अशी मागणी श्री. बैसाणे व श्री. पाटील यांनी केली. 

शासकीय भूखंड खरेदी-विक्रीचा धंदा 
धुळे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक शासकीय भूखंड शासकीय कर्मचा-यांना हाताशी धरून भूखंड माफिया गैरप्रकाराने खरेदी- विक्री करतात व त्यातून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करतात असे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवतात मात्र शासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याने अशी प्रकरणे कागदोपत्री रफादफा केली जातात. धुळे शहरातील भूमी अभिलेख विभाग हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे. पंकज पवार नावाचा अधिकारी भ्रष्टाचाराचा मुखिया आहे असा आरोपही श्री. बैसाणे व श्री.पाटील यांनी निवेदनात केला आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image