पोलिसांनीच फेकला महामार्गावर मराठेचा मृतदेह? 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

नगरसेवकाच्या गुदामातील तांदूळ चोरी प्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर दोंडाईचा पोलिसांनी तीन संशयितांना ७ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यात हमाल मोहन मराठेचा समावेश होता. मारहाणीनंतर त्याचा दोंडाईचा पोलिस ठाण्यात मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

धुळे : चौकशीसाठी ताब्यातील हमाल मोहन मराठे (वय ३६) याला झालेल्या शिवीगाळ, मारहाणीनंतर त्याने दोंडाईचा पोलिस ठाण्यात आत्महत्या केली. त्याने आत्महत्या केली, त्यास प्रवृत्त केले की अन्य काही घडले याविषयी, तसेच मोहनचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह दोंडाईचा पोलिसांनीच शहादा मार्गावर फेकला, अन्यथा मृतदेह तेथे आलाच कसा, असा गंभीर प्रश्‍न पीडित मराठे कुटुंबासह जिल्हावासियांना पडला आहे. तसे घडले असेल तर तो संतापजनक, `खाकी` वर्दीतील असंवेदनशीलतेचा कळस ठरेल. या प्रकरणी उपस्थित होत असलेले प्रश्‍न, आरोपांमागचे सत्य `सीआयडी`ने उजेडात आणावे, अशी मागणी आहे. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलिस प्रशासनाने दोंडाईचाचे साहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड, बीट हवालदार वासुदेव जगदाळे, ठाणे अंमलदार प्रमोद चौधरी यांना निलंबित केले आहे. उपनिरीक्षक देविदास पाटील, दिनेश मोरे यांचे जाबजबाब घेतले जात आहेत. 

नेमकी घटना काय? 
नगरसेवकाच्या गुदामातील तांदूळ चोरी प्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर दोंडाईचा पोलिसांनी तीन संशयितांना ७ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यात हमाल मोहन मराठेचा समावेश होता. मारहाणीनंतर त्याचा दोंडाईचा पोलिस ठाण्यात मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. या प्रकाराविषयी पीडित मराठे कुटुंब साशंक आहे. दुपारी पाचला मोहनची आई भेटीसाठी गेल्यावर दोंडाईचा पोलिस ठाण्यात उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना रवाना करण्यात आले. नंतर मोहनला वैद्यकीय तपासणीसाठी नेल्याचा दावा संबंधित पोलिसांनी केला. सायंकाळी साडेसहानंतर मोहनचा मृतदेह थेट शहादा मार्गावर आढळल्याने खळबळ उडाली. त्याचा मृतदेह संबंधित दोंडाईचा पोलिसांनीच नेला असून तो शहादा मार्गावर फेकून दिल्याचा दाट संशय कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी तत्काळ तपास ‘सीआयडी’ कडे वर्ग करत पोलिस कर्मचारी राठोड, जगदाळे, चौधरीला निलंबित केले. 

छावणीचे स्वरूप 
परिवीक्षाधीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील (शिरपूर), निरीक्षक आनंद कोकरे (दोंडाईचा), निरीक्षक योगेश राजगुरू (नरडाणा), निरीक्षक अभिषेक पाटील (सांगवी), सचिन साळुंके (थाळनेर), दंगा काबू नियंत्रक पथकातील १६ कर्मचारी आदी बंदोबस्त असल्याने दोंडाईचा परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 

`सीआयडी`पुढे तपासाचे आव्हान 
`सीआयडी` पुढे आता मोहनने दोंडाईचा पोलिस ठाण्यात आत्महत्या केली की नेमके काय घडले, त्याचा मृत्यू किती वाजता झाला, त्याचा मृतदेह पोलिस ठाण्यातून कुणी- कुणी बाहेर नेला, शहादा मार्गावर त्याचा मृतदेह फेकून देण्यास कुणी सांगितले, या मागच्या कटकारस्थानात कोण- कोण सहभागी होते, आदी मुद्यांच्या तपासाचे आव्हान आहे. तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष असेल 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule mohan marathe dead body in highway police