निकृष्ट काम झाल्यास मुलाहिजा ठेवणार नाही : खासदार डॉ. भामरे यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी सध्या खोदकाम सुरू आहे. या कामासह पाइपलाइनचे काम तसेच वापरण्यात येणाऱ्या साहित्याची डॉ. भामरे यांनी पाहणी केली. या योजनेच्या कामासाठी 18 महिन्यांचा कालावधी आहे.

धुळे : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर 169 कोटीच्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम गुणवत्तापूर्ण, दर्जेदार होईल याची दक्षता घ्या. या कामात दिरंगाई अथवा निकृष्ट काम झाल्यास आम्ही कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही असा इशारा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज अधिकारी, ठेकेदाराला दिला. 

श्री. भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, विरोधी पक्षनेते साबीर शेठ, आयुक्त अजीज शेख यांच्यासह नगरसेवकांनी आज अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. नगरसेवक प्रदीप कर्पे, हिरामण गवळी, रावसाहेब नांद्रे, एमजेपीचे कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम, उपअभियंता श्री. पाटील, भिकन वराडे, राकेश कुलेवार, महापालिकेचे ओव्हरसियर चंद्रकांत उगले, सी. सी. बागूल, ठेकेदाराचे प्रतिनिधी अजित पाटील आदी उपस्थित होते. योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी सध्या खोदकाम सुरू आहे. या कामासह पाइपलाइनचे काम तसेच वापरण्यात येणाऱ्या साहित्याची डॉ. भामरे यांनी पाहणी केली. या योजनेच्या कामासाठी 18 महिन्यांचा कालावधी आहे. मात्र लॉकडाऊनमुळे मध्यंतरी काम बंद होते. या पार्श्‍वभूमीवर गतीने काम करावे. दर 15 दिवसात कामाचा आढावा घेतला जाईल, दरमहा कामाची पाहणी केली जाईल. योजनेचे काम दर्जेदार करण्याबाबत दक्षता घ्यावी असे डॉ. भामरे यांनी अधिकारी, ठेकेदाराच्या प्रतिनिधीला सांगितले. शहरातील नागरिकांना दैनंदिन पाणीपुरवठा करण्याचे आम्ही अभिवचन दिले आहे ते पूर्णत्वास नेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आमचा शब्द आम्ही खरा करू असा विश्‍वासही डॉ. भामरे यांनी यावेळी व्यक्त केला. 

सद्यःस्थितीतील काम असे 
जलशुद्धीकरण केंद्रासाठी खोदकाम सुरू आहे. जलशुद्धीकरण केंद्रापासून हनुमान टेकडीपर्यंत 12 एमएम व्यासाच्या जलवाहिनीचे काम 320 मीटर पूर्ण झाले आहे. या योजनेव्यतिरिक्‍त तापी पाणीपुरवठा योजनेवरील जीर्ण झालेल्या जलवाहिनीला सध्या दोन किलोमीटरपर्यंत ऑक्‍सीपेट झाले आहे. डेडरगाव तलाव ते मालेगाव जलकुंभापर्यंत सुमारे सहा किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तापी योजनेवरील कालबाह्य पंप बदलण्याचीही कार्यवाही सुरू असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule mp bhamre akkalpada water supply sceame low kwality