भाजपचे मिशन दहाने "मायनस'! 

भाजपचे मिशन दहाने "मायनस'! 

धुळे ः येथील महापालिकेच्या सत्तासंघर्षात "फिफ्टी प्लस'चा नारा देत राज्यातील सत्ताधारी भाजपने परिवर्तन घडविण्याचा चंग बांधला. मात्र, स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत गटबाजीच्या फटक्‍यामुळे "फिफ्टी प्लस'चा नारा दहाने "मायनस' करून "फोर्टी प्लस' मिशन राबविण्याची वेळ पक्षावर येत असल्याचे चित्र आहे. सर्वेक्षणावरही विजयाची मदार राखणाऱ्या भाजप नेत्यांच्या हालचालींतून निघणारे "अंडर- करंट' टिपण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. 
येथील महापालिकेत दीड दशकापासून एकहाती सत्ता राखणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला धूळ चारण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. जामनेर, मुक्ताईनगर, सांगली, नाशिक, जळगाव येथील नगरपालिका- महापालिका भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. त्याप्रमाणे येथील महापालिका निवडणुकीतून भाजपचा झेंडा रोवण्यासाठी नेत्यांकडून योग्य ती रणनीती आखली गेली. यात अवघे धुळे शहर भगवामय करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी एक ते दोन ट्रक भाजपच्या कमळ चिन्हांसह रंगसंगतीचे प्रचार साहित्य शहरात आणण्यात आले. 

सर्वेक्षणावर भाजपची मदार 
प्रस्थापित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महापालिका निवडणुकीतील विजयामागचे गणित आणि "अंडर- करंट' ओळखण्यासाठी भाजपने सर्वेक्षणावर भर दिला. सुरवातीपासून सर्वेक्षणाअंती सक्षम, मेरिटचे, निवडून येणारे उमेदवार दिले जातील, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांसह निवडणूक प्रभारींनी लावून धरली. या भूमिकेवर या पक्षाच्याच आमदारांनी टीकेची तोफ डागली. त्यामुळे सर्वेक्षणाचा बोलबाला सुरू झाला. भाजप सर्वेक्षणाशिवाय निवडणुकीत कुठलीच पावले उचलत नाहीत, उमेदवार देत नाहीत, असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. यातून अनेक पक्षी मारण्याची खेळीही भाजपने खेळली. कारण सर्वेक्षणात "ना पसंती, कमी सक्षम' असल्याचे सांगत अनेकांची उमेदवारी डावलण्यात आली. 

सर्वेक्षणाचे उघड गुपित 
भाजपचे हेच सर्वेक्षण आपल्या पथ्यावर पडावे म्हणूनही विरोधक कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व इतर पक्ष घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे भाजपचे सर्वेक्षण हे उघड गुपित ठरले आहे, हे विशेष. पहिल्या सर्वेक्षणात "फिफ्टी प्लस', दुसऱ्या सर्वेक्षणानंतर भाजपला "फोर्टी प्लस' मिशन अमलात आणण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आता या पक्षातर्फे महत्त्वाचे व तिसरे सर्वेक्षण केले जात आहे. ते अंतिम टप्प्यात आहे. त्याकडे संबंधितांच्या नजरा लागल्या आहेत. त्यात मिशन "फोर्टी'वरून पुन्हा "फिफ्टी प्लस' होते की "फोर्टी'पेक्षा आणखी कमी होते, हा उत्सुकतेचा विषय ठरतो आहे. त्यानुसार भाजप पुढील रणनीती ठरवेल. हे सर्वेक्षण जाणून घेण्यासाठी भाजपचे पारंपरिक विरोधकही उत्सुक आहेत. सत्तासंघर्षात मतदारांमधील "अंडर- करंट' जो पक्ष ओळखेल तो सत्तेचा मानकरी ठरेल, हेही सांगणे न लगे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com