आमदार गोटे विरोधकांच्या तंबूत डेरेदाखल! 

आमदार गोटे विरोधकांच्या तंबूत डेरेदाखल! 

धुळे ः प्रखर विरोध करूनही काही विरोधकांना पक्षात प्रवेश दिल्याने आमदार अनिल गोटे स्वपक्षीय भाजपचे तीन मंत्री, प्रदेशाध्यक्षांवर तीव्र नाराज आहेत. यातच भाजपकडून अंतर, निवडणुकीच्या नेतृत्वापासून वंचित ठेवले जात असल्याने गोटे यांनी थेट गेल्या 25 वर्षांतील क्रमांक एकचे कट्टर राजकीय शत्रू राजवर्धन कदमबांडे यांच्याशीच हातमिळवणी करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, अशा आशयाचे जाहीर पत्रक काढले. त्यावरून भाजपमधील विरोधी गटाला रोखण्यासाठी गोटे हे विरोधकांच्या तंबूत डेरेदाखल होत असल्याचा निष्कर्ष राजकीय वर्तुळातून काढला जात आहे. 
येथील महापालिकेच्या निवडणुकीमुळे शहरात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडत आहेत. प्रसंगी ती शहराच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारी ठरू शकतील, असे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पूर्वाश्रमीच्या गुंड, खंडणीखोर, गुन्हेगारांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याचे सांगत या भूमिकेस गोटे यांनी विरोध दर्शविला आहे. शिवाय येथील निवडणुकीचे नेतृत्व पक्षाने जळगाव जिल्ह्याच्या नेतृत्वाकडे सोपविल्याने गोटे आणखीनच अस्वस्थ आहेत. 
 
गोटेंच्या भूमिकेवरच चर्चा 
टीकाटिप्पणी, आरोप, कमरेखालच्या भाषेतून प्रतिमाहनन यांसारखी विरोधकांबाबत नेहमीची अस्त्रे- शस्त्रे वापरूनही त्याची दखल भाजपचे मंत्री, वरिष्ठ नेत्यांनी न घेतल्याने गोटे आणखीनच भडकले. त्यात त्यांनी शहराच्या विकासासाठी सैतानाशी युती करेल, कदमबांडे तर माजी आमदार आहेत, त्यांच्याकडून युतीचा प्रस्ताव आला तर मुख्यमंत्र्यांशी बोलून अंतिम निर्णय केला जाईल, अशी जाहीर पत्रकाद्वारे भूमिका मांडली आहे. त्यावर शहरासह जिल्ह्यात चर्चा रंगलेली आहे. 
 
गोटेंची युतीबाबत खेळी का? 
कदमबांडे यांच्याशी "युती' करू शकतो, असे दर्शविताना गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलूनच याबाबत अंतिम निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. याचा अर्थ भाजपने प्रवेश करून घेतलेल्या माझ्या काही विरोधकांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, महापौरपदाचा उमेदवार मी सुचविलेला असावा आणि गोटे समर्थकांना काही जागा भाजपने द्याव्यात या मागणीसाठी आमदार गोटे यांनी कदमबांडे यांचा आधार घेत ही खेळी केल्याचे, त्यातून मुख्यमंत्र्यांकडूनही काही वदवून घेण्याचे तंत्र अवलंबिल्याची चर्चा रंगते आहे. अन्यथा, ते भाजपला महापालिकेतील सत्तेपासून रोखण्यासाठी कदमबांडे, कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, लहान- सहान पक्ष, संघटनांच्या तंबूत डेरेदाखल झाले तर आश्‍चर्य वाटू नये, असे बोलले जाते. 
 
मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा, पण... 
गेल्या विधानसभा निवडणुकीत गोटे यांना रोखण्यासाठी सर्व विरोधक एकत्र झाले होते. त्याप्रमाणे पक्षातील विरोधकांना, पर्यायाने भाजपला रोखण्यासाठी गोटे हे महापालिका निवडणुकीवेळी इतर विरोधकांच्या तंबूत डेरेदाखल झाल्याचे बोलले जाते. त्यास कदमबांडे यांच्याशी "युती' करण्याबाबत काढलेल्या पत्रकाद्वारे पुष्टी मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते. महापालिका निवडणूक तोंडावर आहे. मुख्यमंत्र्यांनी विश्‍वासू गोटातील वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपविली आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. असे असताना कदमबांडे यांच्याशी "युती'बाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय माझ्यासाठी अंतिम राहील, अशी अपेक्षा गोटे का बाळगून आहेत, हे धुळेकरांना कळायला मार्ग नाही. 
 
विरोधकांचा प्रचार गोटे करतील? 
मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की कदमबांडे यांच्याशी युती करू नका, भाजपमधील विरोधी गटाशी जुळवून घ्या, तर गोटे हे कदमबांडे यांच्याशी युती करण्याचा विचार सोडून देतील का? प्रसंगी ते उमेदवार राहणाऱ्या स्वपक्षातील विरोधकांचा नेते म्हणून प्रचार करण्याची तयारी दर्शवतील का?, की गोटे यांच्या मागणीप्रमाणे पक्षातील विरोधकांना उमेदवारी दिली जाणार नाही, महापौरपदाचा उमेदवार त्यांच्या पसंतीचा राहील आणि काही गोटे समर्थकांना जागा दिल्या जातील, या प्रश्‍नांची उत्तरे गोटे आणि भाजपमधील आगामी घडामोडींवरून स्पष्ट होऊ शकतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com