महापौर'पदी अखेर "सोनारां'च 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

धुळे ः महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महापौर, उपमहापौरपदाचा सस्पेन्स आजअखेर संपला. अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी भाजपकडून महापौरपदासाठी चंद्रकांत सोनार, तर उपमहापौरपदासाठी कल्याणी अंपळकर यांनीच अर्ज भरल्याने त्यांची निवड निश्‍चित झाली. 31 डिसेंबरला विशेष महासभेत निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकृतरीत्या महापौर, उपमहापौर पदाची घोषणा होईल. 

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 9 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर 10 डिसेंबरला निकाल जाहीर झाला. या निकालात भाजपने 74 जागांपैकी तब्बल 50 जागा जिंकत महापालिकेची सत्ता मिळविली. त्यानंतर महापौरपद कुणाला मिळणार याची चर्चा सुरू झाली होती. यात साधारण सहा-सात नगरसेवकांनी इच्छा व्यक्त केल्याने त्यांची नावे पुढे आली होती. त्यामुळे पक्ष कुणाला संधी देणार, याची उत्सुकता होती. महापौर, उपमहापौर या दोन्ही पदांसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ही उत्सुकता अखेर संपली. 

सोनार, अंपळकर यांना संधी 
महापौरपदाची चर्चा सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन-तीन नावांत प्रभाग क्रमांक-9 (क) मधून निवडून आलेले भाजपचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांचाही समावेश होता. अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास सोनार यांनी महापौरपदासाठी दोन अर्ज भरले. सोनार यांच्या अर्जावर हर्षकुमार रेलन, देवेंद्र सोनार सूचक तर प्रदीप कर्पे व विजय जाधव अनुमोदक आहेत. उपमहापौरपदासाठी प्रभाग क्रमांक 14 (क) मधून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका कल्याणी सतीश अंपळकर यांनी अर्ज भरला. त्यांच्या अर्जावर राजेश पवार सूचक, तर सुनील बैसाणे अनुमोदक आहेत. या दोन्ही उमेदवारांनी प्रभारी नगरसचिव नारायण सोनार यांच्याकडे अर्ज सादर केला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, वालीबेन मंडोरे, प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, भारती माळी, नंदू सोनार, सुनील बैसाणे, हर्षकुमार रेलन, गजेंद्र अंपळकर, सतीश अंपळकर, भगवान गवळी आदी उपस्थित होते. 

आजच आनंद व्यक्त 
भाजपकडून महापौरपदासाठी श्री. सोनार व उपमहापौरपदासाठी श्रीमती अंपळकर यांचेच अर्ज सादर झाल्याने त्यांची निवड निश्‍चित झाली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर श्री. सोनार, श्रीमती अंपळकर यांच्यासह भाजपच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत आनंद व्यक्त करत घोषणाबाजी केली.

Web Title: marathi news dhule muncipal corporation mayer sonar