esakal | सुधारणा न झाल्यास थेट तुकाराम मुंडेंकडे तक्रार करेन !
sakal

बोलून बातमी शोधा

सुधारणा न झाल्यास थेट तुकाराम मुंडेंकडे तक्रार करेन !

भुयारी गटार योजनेच्या कामाबाबत वारंवार बैठका घेऊन, पत्रव्यवहार करुनही कंत्राटदाराकडून कामात सुधारणा हात नाही, त्यामुळे एमजेपीचे अधिकारीदेखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येते.

सुधारणा न झाल्यास थेट तुकाराम मुंडेंकडे तक्रार करेन !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः वारंवार बैठका घेऊन, पत्रव्यवहार करूनही कामात सुधारणा होत नाही, यावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचेही कामाकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कामात सुधारण न झाल्यास एमजेपीचे नवनियुक्त सदस्य सचिव तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार करेन, असा सज्जड इशारा स्थायी समितीचे सभापती सुनील बैसाणे यांनी एमजेपीचे अधिकारी व योजनेच्या कंत्राटदाराच्या प्रतिनिधींना दिला.


अमृत योजनेंतर्गत देवपूर भागात १३१ कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. मात्र यातील काही कामे निकृष्ट व तांत्रिकृष्या सदोष तसेच एस्टिमेटप्रमाणे होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. एका नागरिकाने त्यांच्या घरासमोरच योजनेंतर्गत चेंबरचे काम सदोष असल्याची तक्रार करून एमजेपीच्या अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती दाखविली. हा सर्व प्रकाराची बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. शिवाय महापालिकेकडेही याबाबत तक्रार झाली. या पार्श्‍वभूमीवर स्थायी समितीचे सभापती बैसाणे यांनी सोमवारी (७ सप्टेंबर) दुपारी चारला महापालिकेत एमजेपीचे अधिकारी, योजनेच्या कंत्राटदाराचे प्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी यांची बैठक घेतली, कामाचा आढावा घेतला. महापालिकेचे अभियंता कैलास शिंदे, नगरसचिव मनोज वाघ, ओव्हरसियर पी. डी. चव्हाण, एमजेपीचे शाखा अभियंता डी. डी. पाटील, सहाय्यक अभियंता एस. एस. धात्रे, शाखा अभियंता आर. सी. पाटील, कंत्राटदाराचे प्रतिनिधी हितेश पटेल, योगेश पाटील, दर्शनकुमार नायक तसेच प्रवीण अग्रवाल, राकेश कुलेवार आदी उपस्थित होते.

कामाकडे ‘एमजेपी’चे दुर्लक्ष
भुयारी गटार योजनेच्या कामाबाबत वारंवार बैठका घेऊन, पत्रव्यवहार करुनही कंत्राटदाराकडून कामात सुधारणा हात नाही, त्यामुळे एमजेपीचे अधिकारीदेखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येते. एमजेपीने याची दखल घेऊन काम करून घ्यावे, तसा अहवाल महापालिकेला द्यावा. या योजनेच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने देवपूर भागातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक हे आता एमजेपी व कंत्राटदाराविरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कामात सुधारणा करा अन्यथा एमजेपीचे सदस्य सचिव तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार करेन व पाठपुरावाही करेन असा इशारा सभापती बैसाणे यांनी दिला. भुयारी गटार कामाच्या अनुषंगाने महापालिकेने एमजेपीला केलेल्या पत्रव्यवहाराचा अहवाल सादर करावा असा आदेशही त्यांनी दिला. खडी टाकताना नागरिकांना दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी, रस्त्याच्या रिफिलींगचे काम व्यवस्थित करावे. योजनेच्या कामाची स्वतः पाहणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 

संपादन- भूषण श्रीखंडे