esakal | धुळ्यात थकीत ६६ कोटींचा ‘डोंगर’;मनपाकडून जप्तीच्या नोटिसा
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

धुळ्यात थकीत ६६ कोटींचा ‘डोंगर’;मनपाकडून जप्तीच्या नोटिसा

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी


धुळे : मालमत्ता कर वसुलीत महापालिकेची (Dhule Municipal Corporation) कामगिरी गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडी बरी असली तरी एकूण थकबाकीचा आकडा मात्र प्रचंड मोठा असल्याने महापालिका प्रशासनापुढे करवसुलीची (Tax collection) डोकेदुखी कायम आहे. ही डोकेदुखी कमी करण्यासाठी प्रशासनाची सध्या कसरत सुरू असून, मालमत्ता कर विभागाकडून थकबाकीदारांना नोटिसा (Notice) बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. आत्तापर्यंत तीन हजारपैकी निम्म्यावर थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत.

हेही वाचा: डेंगीचे डास आढळले, तर गुन्हा दाखल करू-मनपा आयुक्त


महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता करवसुलीचा प्रश्‍न दर वर्षी महापालिका प्रशासनासमोर डोकेदुखीचा विषय असतो. विशेषतः थकबाकी वसुली होत नसल्याने हा आकडा दर वर्षी वाढतच आहे. महापालिका प्रशासनाकडून अनेकदा अभय योजना जाहीर करून थकबाकीवरील शास्ती (दंड) १०० टक्के माफ करण्याची संधीही दिली गेली मात्र तरीही थकबाकीचा आकडा कमी झालेला नाही.तब्बल ८४ कोटी थकबाकी
मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी महापालिकेचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल ८४ कोटी रुपये थकबाकीदारांकडून येणे आहे. यात तब्बल ५६ कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. महापालिकेने यापूर्वी अनेकदा अभय योजना लागू करून या थकबाकी वसुलीचा प्रयत्न केला, त्याचा काही प्रमाणात फायदा झाला असला तरी थकबाकीचा आकडा पाहता हे प्रयत्न तोकडे असल्याचेच चित्र आहे.१८ कोटी वसुली
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटाने नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. स्वाभाविकपणे त्याचा परिणाम महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीवरही झाला आहे. मालमत्ता करापोटी यंदा १ एप्रिल ते ३१ ऑगस्टदरम्यान महापालिकेच्या तिजोरीत १८ कोटी रुपये जमा झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार करता ही वसुली चार कोटी रुपये अधिक आहे. असे असले तरी एकूण थकबाकीपोटी ही वसुली केवळ २२ टक्के असल्याने अद्यापही तब्बल ६६ कोटी रुपये वसुलीचे मोठे आव्हान महापालिकेपुढे कायम आहे.

हेही वाचा: कपाशीच्या शेतात मासे आणि भर रस्त्यावर नागरिकांची एकच धुम..


जप्तीच्या नोटिसा
थकबाकी वसुलीसाठी अभय योजनेची संधी देऊनही थकबाकीदार प्रतिसाद देत नसल्याने दर वर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेकडून थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ज्या थकबाकीदारांकडे ४० हजारांवर रक्कम थकीत आहे, अशा साधारण तीन हजार थकबाकीदारांना महापालिकेकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत. यात आतापर्यंत ५० ते ७५ टक्के नोटिसा बजावण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

थकबाकी-वसुलीची स्थिती अशी
-मूळ थकबाकी...५६ कोटी
-शास्ती (दंड)...२८ कोटी
-एकूण थकबाकी...८४ कोटी
-ऑगस्टअखेर वसुली...१८ कोटी


थकबाकीदारांना नोटिसा
-तीन हजार थकबाकीदारांना नोटिसा
-४० हजारांवर रक्कम थकीत असलेल्यांना नोटिसा
-प्रत्यक्ष जप्तीसाठी आदेश निर्गमितची प्रक्रिया सुरू
-नोटिसा बजावल्यानंतर काही थकबाकीदारांचा प्रतिसाद

loading image
go to top