मोबाईलसाठी त्‍यांनी घेतला थेट जीव 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 July 2020

अज्ञात व्यक्तींनी जितेंद्रच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याचे पहाटे उजेडात आले. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. कुणाच्याही देण्याघेण्यात नसलेल्या शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या जितेंद्रच्या खुनामुळे कुटुंबीय धास्तावलेले होते. 

धुळे : मोबाईल, पैसे हिसकावताना प्रतिकार केल्याने रागाच्या भरात जितेंद्र मोरेचा दगडाने डोके ठेचून खून केल्याची कबुली दोन सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी (ता. १७) पोलिसांना दिली. संशयित दोघांना पोलिसांनी अटक केली. मृत आणि मारेकरी तरुण असल्याने चिंता व्यक्त झाली. 
मोगलाई परिसरात फुलेनगरमधील जितेंद्र मोरे (वय ३४) कुरिअर कंपनीत नोकरीला होता. त्याचा १० जुलैला मध्यरात्रीनंतर पांझरा नदीकाठी असलेल्या मंदिराजवळ खून झाल्याचे आढळले. तेव्हा अज्ञात व्यक्तींनी जितेंद्रच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याचे पहाटे उजेडात आले. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. कुणाच्याही देण्याघेण्यात नसलेल्या शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या जितेंद्रच्या खुनामुळे कुटुंबीय धास्तावलेले होते. 
जितेंद्रचा खून करणाऱ्या गुन्हेगारांनी कुठलाही पुरावा हाती लागणार नाही याची दक्षता घेतली होती. त्यामुळे पोलिसांना धागेदोरे मिळत नव्हते. शहर पोलिस ठाणे आणि समांतर एलसीबीच्या पथकाकडून तपास सुरू होता. जितेंद्रचा खून झाला त्या रात्री मोटारसायकलस्वार दोन तरुण एसटी स्थानकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होते. त्यांनी कमलाबाई शाळेजवळ एका दुचाकीस्वाराला अडवून मारहाण केली, तसेच त्याच्याकडील बाराशे रुपये आणि दोन मोबाईल हिसकावून घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला. नंतर दोन्ही गुन्हेगारांनी पांझरा नदीकाठी मोर्चा वळविला. तेथे त्यांना जितेंद्र नदीकाठी मंदिराजवळ बसलेला दिसला. गुन्हेगारांनी जितेंद्रकडील मोबाईल हिसकावला. त्या वेळी जितेंद्रने प्रतिकार केला. त्यामुळे चिडलेल्या दोघा संशयितांपैकी एकाने जितेंद्रच्या डोक्यावर दगडाने वार केला. गंभीर जखमी जितेंद्रला गुन्हेगारांनी नदीपात्रात फेकले. त्याच्याकडील मोबाईल व रोकड हिसकावून दोघांनी पळ काढला. ते काही वेळाने पुन्हा घटनास्थळी आले. तेव्हा रक्तबंबाळ जितेंद्र नदीपात्रातून रस्त्यावर आला होता. तो जिवंत असल्याचे पाहून दोघा गुन्हेगारांनी जितेंद्रला दगडाने ठार केले. दोघे मारेकरी पळून गेले. 
पोलिसांना माहिती मिळताच वाडीभोकर रोडवरील दैठणकरनगरात राहणाऱ्या राहुल ऊर्फ हंक्या सुनील घोडेला (वय १९) ताब्यात घेतले. त्याला पोलिसांनी बोलते केले. त्याने साथीदार हर्षल जिजाबराव पाटील याच्या मदतीने जितेंद्रचा खून केल्याची कबुली दिली. राहुल हाती लागल्याचे समजताच हर्षल दुचाकीने पळाला. त्याच्या दुचाकीला अपघात झाला. तो खासगी रुग्णालयात दाखल झाला. उपचारानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरिक्षक हनुमंत उगले, हवालदार रफिक पठाण, श्रीकांत पाटील, संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, मयूर पाटील, तुषार पारधी, गुलाब पाटील यांनी ही कारवाई केली. 

सुधारगृहानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे... 
प्रमुख संशयित राहुल घोडे काही गुन्ह्यांमुळे सुधारगृहात होता. तेथे त्याचे वर्तन सभ्य होते. पुढे गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी त्याला मुंबईला व्यावसायिक प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. तेथून परतल्यावर त्याची सुधारगृहातून सुटकाही झाली. मात्र, काही महिन्यांत तो वाईट संगतीमुळे गुन्हेगारी जगतात अडकला. त्याचे आई-वडील मोलमजुरी करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule murder case police arrested two saspected