तरीही धुळे "जनरल वॉर्डा'त; नंदुरबार मात्र "आयसीयू'त! 

रमाकांत घोडराज
Thursday, 25 June 2020

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. वाढता संसर्ग कमी व्हावा, यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

धुळे :  शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत असली तरी कोरोना रुग्णांच्या "रिकव्हरी रेट'मध्ये धुळे जिल्ह्याची स्थिती लगतच्या जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली आहे. तीन दिवसांपूर्वीच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या आकडेवारीनुसार "रिकव्हरी रेट'मध्ये राज्यात धुळ्याचे स्थान 15 व्या स्थानी आहे, तर यात नंदुरबार मात्र तळातील पाचमध्ये गेले आहे, तरीही धुळे जिल्हा "जनरल वॉर्डात; तर नंदुरबार मात्र "आयसीयू'त गेल्यागत स्थिती आहे. 
लॉकडाउन शिथिल केल्यानंतर धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. वाढता संसर्ग कमी व्हावा, यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. असे असले तरी राज्यभराचा विचार केला तर कोरोना रुग्णांच्या "रिकव्हरी रेट'बाबत धुळे जिल्हा तुलनेने चांगल्या स्थितीत आहे. त्यातही नंदुरबार, जळगाव, नाशिक या लगतच्या जिल्ह्यांच्या तुलनेत धुळ्याची स्थिती चांगली दिसते. राज्यात कोल्हापूरचा "रिकव्हरी रेट' सर्वांत चांगला अर्थात 90.4 टक्के एवढा आहे. धुळे जिल्ह्याचा "रिकव्हरी रेट' 65.8 टक्के आहे. 

नंदुरबार तळातील पाचमध्ये 
राज्यात रिकव्हरी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये वाशीम, पालघर, ठाणे, नंदुरबार व सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच नाशिक 26 तर जळगाव 29 व्या स्थानी आहे. 

सुधारणेच्या सूचना 
कोरोना रुग्णांच्या "रिकव्हरी रेट'मध्ये सुधारणेच्या अनुषंगाने आरोग्य सेवा (पुणे) संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य सेवा उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिकेचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. राज्याचा "रिकव्हरी रेट' सध्या 49.8 टक्के तर देशाचा 52.7 टक्के आहे. केंद्र शासनाच्या नवीन डिस्चार्ज पॉलिसीनुसार व राज्यस्तरावरून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व रुग्णांच्या वर्गीकरणानुसार रुग्णांना वेळेवर डिस्चार्ज करावे. ज्या रुग्णांना "होम आयसोलेशन' करण्यात आले आहे, त्यांना 17 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यात लक्षणे नसल्याची खात्री करून त्यांना "रिकव्हर्ड' म्हणून घोषित करावे, असे डॉ. पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. "रिकव्हरी रेट' कमी असलेल्या वाशीम, पालघर, ठाणे, नंदुरबार, सोलापूर या जिल्ह्यांसह इतरही जिल्ह्यांनी डेथ व रिकव्हरी रेटबाबत दैनंदिन आढावा घेऊन कार्यवाही करावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 
 
जिल्हानिहाय "रिकव्हरी रेट' असा (टक्‍क्‍यांमध्ये) 
कोल्हापूर- 90.4, परभणी- 87.1, हिंगोली- 84.9, वर्धा- 78.6, गडचिरोली- 78.0, सिंधुदुर्ग- 77.3, चंद्रपूर- 75.9, नगर- 74.6, उस्मानाबाद- 73.9, बीड- 69.9, सातारा- 69.5, यवतमाळ- 69.1, गोंदिया- 68.3, रत्नागिरी- 66.7, धुळे- 65.8, भंडारा- 65.3, बुलडाणा- 65.0, लातूर- 64.1, अकोला- 63.7, जालना- 63.3, अमरावती- 63.0, नागपूर- 62.9, नांदेड- 62.1, रायगड- 60.9, औरंगाबाद- 55.3, नाशिक- 55.2, सांगली- 54.6, पुणे- 54.3, जळगाव- 52.6, मुंबई- 50.4, सोलापूर- 46.7, नंदुरबार- 43.4, ठाणे- 39.3, पालघर- 30.3, वाशीम- 23.9. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule nandurbar corona virus positive ratio not cover