धुळ्यात घंटा वाजलीच नाही; जिल्हाधिकाऱ्यांचे पडताळणीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

धुळे येथे दहावीच्या काही खासगी शाळा ‘रिपोर्ट डे’मुळे सुरू होत्या. परंतु पाच ते दहा विद्यार्थीही उपस्थित नव्हते. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोनला बैठक झाली.

धुळे/ नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असणाऱ्या शाळा सोमवार (ता. २३) पासून सुरू होणार होत्‍या. धुळे शहरासह जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या सरासरी ३६८ शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सोमवारी (ता. २३) एकही खुले झाले नाही. तर नंदुरबार जिल्‍ह्यात ३१४ पैकी २५० शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आज घंटा वाजली. परंतु विद्यार्थ्यांचा अत्‍यल्प प्रतिसाद होता. जळगाव जिल्‍ह्यातील शाळा ७ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश रविवारीच (ता. २२) दिले आहे. 

धुळे येथे दहावीच्या काही खासगी शाळा ‘रिपोर्ट डे’मुळे सुरू होत्या. परंतु पाच ते दहा विद्यार्थीही उपस्थित नव्हते. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोनला बैठक झाली. यात माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे व अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यात ३० नोव्हेंबरपर्यंत शासनाने विद्यार्थी सुरक्षिततेबाबत सांगितलेल्या उपाययोजना शालेय व्यवस्थापनाने केलेल्या आहेत किंवा नाही, याची केंद्रप्रमुख व शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना झाल्याची खात्री झाल्यानंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होतील, असे संयुक्त बैठकीत ठरले. 

नंदुरबारमध्ये वाजली घंटा 
मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले होते. तेव्हापासून ते २२ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद होत्या. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. अनेकांनी लॉकडाउन कालावधीत ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात अनेक शिक्षकांनी पायपीट करीत विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन ज्ञानदान करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी शाळा बंद असल्याने ऑनलाइन अध्यापन व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापन करणे शक्य नसल्याने मर्यादा निर्माण झाल्या होत्या. 
सद्यःस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करणे गरजेचे असल्याने आजपासून जिल्ह्यातील ३१४ शाळांपैकी २५० शाळा सुरू करण्यात आल्या आहे. यामध्ये अक्कलकुवा तालुक्यातील ३२, धडगाव १३, तळोदा २७, शहादा ५५, नवापूर ३६, नंदुरबार ८७ शाळांमध्ये आज आठ महिन्यांनंतर प्रथमच घंटा वाजली. ३२,०३० विद्यार्थ्यांपैकी २७६६ विद्यार्थी शाळेत आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule nandurbar school open issue collector checking order