esakal | अमरीश पटेलांच्या राजीनाम्याने विधानपरिषदेची पोटनिवडणूक जाहीर 
sakal

बोलून बातमी शोधा

amrish patel

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अमरिश पटेल यांनी विधानपरिषदेचा राजीनामा सुपूर्द केला होता. आमदार पटेल यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 पर्यंत होता.

अमरीश पटेलांच्या राजीनाम्याने विधानपरिषदेची पोटनिवडणूक जाहीर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : विधानपरिषद सदस्य अमरिश पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताना अमरिश पटेल यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. पटेल यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 30 मार्चला मतदान होणार आहे. 

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अमरिश पटेल यांनी विधानपरिषदेचा राजीनामा सुपूर्द केला होता. आमदार पटेल यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 पर्यंत होता. मात्र, त्यांनी 1 ऑक्‍टोबर 2019 ला विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार आज (ता. 5) अधिसूचना जारी होईल. याकरीता 12 मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येईल. तर 13 मार्चला नामनिर्देशनपत्रांची छाननी, 16 मार्चपर्यंत माघारीची मुदत आहे. 

अमरीश पटेल यांच्याबद्दल 
अमरिशभाई रसीकलाल पटेल हे धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून आले होते. कॉंग्रेसच्या तिकीटावर ते सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले होते. परंतु विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पटेल यांनी कॉंग्रेसचा हात सोडून भाजपची वाट धरली होती. 

निवडणूक कार्यक्रम 
केंद्रीय निवडणूक आयोगाने अमरिश पटेल यांच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या जागेसाठी 12 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. 30 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे 31 मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.