महाविकास आघाडीची दोनशे मते फुटली; भाजपचे नेते अमरिश पटेल विजयी 

निखिल सूर्यवंशी
Thursday, 3 December 2020

विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघाची पोटनिवडणूक एक डिसेंबरला झाली. यात ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी आठपासून मतमोजणीस सुरवात झाली.

धुळे : विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघात महाविकास आघाडीला भगदाड पाडत भाजपचे नेते, माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला. निवडणुकीत महाविकास आघाडीची सरासरी २०० मते फुटली आहेत. त्यामुळे या निवडणुकीने आघाडीतील नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघाची पोटनिवडणूक एक डिसेंबरला झाली. यात ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी आठपासून मतमोजणीस सुरवात झाली. त्यात भाजपचे नेते उमेदवार अमरिशभाई पटेल यांना ३३२, तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना ९८ मते मिळाली. चार मते बाद झाली. अनुभवी अमरिशभाईंनी नवखे उमेदवार पाटील यांना अक्षरशः धुळ चारली.

यामुळे भाईंचा विजय 
धुळे- नंदुरबार मतदारसंघात भाजपचे १९९, कॉंग्रेसचे १५७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, शिवसेनेचे २०, असे मिळून महाविकास आघाडीचे २१३, एमआयएमचे ९, समाजवादी पार्टीचे ४, बसप १, मनसे १, अपक्ष १० मतदार आहेत. महाविकास आघाडी कागदावर संख्याबळाने स्ट्रॉंग दिसत असली तरी त्याचा निकालावर प्रभाव दिसून आला नाही. भाजपने या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे भगदाड पाडले. ऐन विधानसभा निवडणुकीवेळी अमरीशभाई पटेल यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सदस्य आणि विधान परिषदेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. यात अमरीशभाई भाजपमध्ये आले तरी त्यांच्या काँग्रेस, राष्ट्रवादीमधील समर्थक सदस्यांनी व इतर पक्षीय  सदस्यांनी या निवडणुकीत आपल्या नेत्याप्रती मतदानातून निष्ठा प्रकट केली. त्यामुळे अमरीशभाईंचा विजय सुकर झाला.

फक्त 98 सदस्य पाठीशी
महाविकास आघाडीच्या पाठीशी धुळे - नंदुरबार मतदारसंघातील केवळ 98 सदस्य असल्याचे या निवडणुकीतून अधोरेखित झाले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule nandurbar vidhan parishad election amrish patel vectary mahavikas aaghadi two hundred vote divart