नरेगा'तून शंभर कोटींवर खर्च! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

धुळे ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 100 कोटी 51 लाखांचा निधी खर्च झाला आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे दीडशे कोटींच्या खर्चाचे "टार्गेट' आहे. यातील निकषित कामांमध्ये सर्वाधिक विहिरींना पसंती दिली जात आहे. या योजनेतून विकासासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. 

धुळे ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 100 कोटी 51 लाखांचा निधी खर्च झाला आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे दीडशे कोटींच्या खर्चाचे "टार्गेट' आहे. यातील निकषित कामांमध्ये सर्वाधिक विहिरींना पसंती दिली जात आहे. या योजनेतून विकासासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. 
जिल्ह्यात काही वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मजुरांना "नरेगा'चा आधार मिळत असतो. पूर्वी अनेक तक्रारी, गैरप्रकारांमुळे वादग्रस्त ठरणारी ही योजना "ऑनलाइन'द्वारे अधिकाधिक पारदर्शक करण्यावर भर दिला जात आहे. सद्यःस्थितीत अनेक अधिकार बहाल झाल्याने योजनेची ग्रामपंचायत ही मालक झाल्याचे वर्तुळात बोलले जाते. 
 
आठवड्याची स्थिती 
गेल्या आठवड्यात चारही तालुक्‍यांतील ग्रामपंचायत स्तरावर एकूण एक हजार 865 सुरू असलेल्या कामांवर 19 हजार 584 मजूर उपस्थित असल्याची नोंद झाली. यात सर्वाधिक मजूर धुळे तालुक्‍यात होते. या तालुक्‍यातील 476 कामांवर सात हजार 285 मजूर, साक्री तालुक्‍यात 588 कामांवर चार हजार 670, शिंदखेडा तालुक्‍यातील 277 कामांवर तीन हजार 262 आणि शिरपूर तालुक्‍यात 524 कामांवर चार हजार 367 मजूर उपस्थित असल्याची नोंद आहे. यंत्रणास्तरावर धुळे तालुक्‍यातील 15 कामांवर 242, साक्री तालुक्‍यात 22 कामांवर 185, शिंदखेडा तालुक्‍यातील पाच कामांवर 45 आणि शिरपूर तालुक्‍यात 25 कामांवर 745 मजूर उपस्थित असल्याची नोंद आहे. या स्तरावर एकूण 67 कामांवर एक हजार 217 मजूर उपस्थित होते. 

विहिरींना अधिक पसंती 
या योजनेंतर्गत रस्ते, जलसंधारण, कृषी, वनीकरण, सामाजिक वनीकरण आणि इतर काही कामांवर भर दिला जात असला तरी विहिरींच्या कामांना सर्वाधिक मागणी आहे. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात आली आहेत. केवळ या कामांची स्थिती तपासली तर चारही तालुक्‍यांत मिळून एक हजार 299 कामांवर 14 हजार 747 मजूर उपस्थित होते. सर्वाधिक कमी सामाजिक वनीकरणाची कामे घेण्यात आली असून, त्यात 14 कामांवर 102 मजुरांची उपस्थिती होती. 

उद्दिष्टाहून अधिक काम..
जिल्ह्यात 2017- 2018 मध्ये 24.36 लाख मनुष्य दिवसांच्या कामाचे उद्दिष्ट होते. जिल्ह्याने अधिक 35.94 लाख मनुष्य दिवस कामाचे उद्दिष्ट गाठले. याकामी 100 कोटी 51 लाखांचा निधी खर्च झाला. चालू वर्षात म्हणजेच 2018- 2019 मध्ये 40.97 लाख मनुष्य दिवसाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी 146 कोटी 95 लाखांचा निधी प्रस्तावित झाला आहे. 

दृष्टिक्षेपात कामांची स्थिती 
* आठवड्यापूर्वी एकूण 1932 कामे सुरू 
* 20 हजार 801 मजुरांची होती उपस्थिती 
* धुळे तालुक्‍यात 491 कामे, 7527 मजूर 
* साक्री तालुक्‍यात 610 कामे, 4855 मजूर 
* शिंदखेडा तालुक्‍यात 282 कामे, 3307 मजूर 
* शिरपूर तालुक्‍यात 549 कामे, 5112 मजूर 
 

Web Title: marathi news dhule narega nidhi