esakal | कोरोनाचा धोका तरीही उत्‍साह कायम; नवचैतन्याला सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

navratrostav

आता सहा-साडेसहा महिन्यानंतर अनलॉक झाल्याने साधारणपणे सर्वच व्यवहार रुळावर येत आहेत. त्यामुळे नागरिकांचे बाहेर पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. 

कोरोनाचा धोका तरीही उत्‍साह कायम; नवचैतन्याला सुरवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात सण-उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करणे नागरिकांना भाग पडले. लॉकडाऊनमुळे हे सण आले आणि गेले असेच चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, आता कोरोनाचे संकट कायम असले तरी अनलॉक झाल्याने थोडे चित्र वेगळे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला देवीच्या मुर्ती, पुजेचे साहित्यासह इतर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजार फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

मार्च-एप्रिलमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे आत्तापर्यंत सर्वच धर्मियांच्या सण-उत्सवांना उत्साहात साजरे करण्यावर निर्बंध आले. शासन-प्रशासनाच्या आवाहनानंतर नागरिकांनीही सार्वजनिक आरोग्याचा धोका लक्षात घेऊन संयम पाळत सण-उत्सव साजरे केले. दरम्यान, आता सहा-साडेसहा महिन्यानंतर अनलॉक झाल्याने साधारणपणे सर्वच व्यवहार रुळावर येत आहेत. त्यामुळे नागरिकांचे बाहेर पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. 

पूर्वसंध्येला बाजारात गर्दी 
नवरात्रोत्सवासाठी शहराच्या विविध भागात देवीच्या मुर्तींसह पुजेच्या साहित्याची दुकाने थाटली आहेत. उद्या (ता.१७) घटस्थापना असल्याने देवीच्या मुर्तींसह इतर वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. काही नागरिक, विक्रेते कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेऊन मास्क लावण्यासह इतर खबरदारी घेतांना दिसले. मात्र अनेकजण मास्कशिवाय खरेदी-विक्री करत असल्याचेही पाहायला मिळाले. शिवाय मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱया आग्रारोडवर सायंकाळी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळल्याचेही पाहायला मिळाले. देवीच्या मुर्तीसह इतर साहित्य खरेदीसाठी दुकानांवर महिला, तरुणींची संख्याही लक्षणीय होती. 

धोका लक्षात ठेवा 
शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांसह बळींची संख्या गेल्या काही दिवसात कमी झाल्याचे पाहायला मिळाले असले तरी नागरिकांसह प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे हे दिलासादायक चित्र समोर आले आहे ही बाब प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग अत्यंत वेगाने व सहजरित्या होतो. त्यामुळे गर्दी टाळणे, फिजिकल डिस्टन्सींग पाळणे, मास्क लावणे अत्यंत गरजेचे आहे. सण-उत्सव साजरे करतांना या बाबींचे उल्लंघन करणे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सण-उत्सव असले तरी नागरिकांनी समंजसपणा दाखविण्याची गरज आहे.