esakal | प्रधानमंत्री आवास’लाही धुळे मनपाकडून ‘बट्टा’ ! 
sakal

बोलून बातमी शोधा

प्रधानमंत्री आवास’लाही धुळे मनपाकडून ‘बट्टा’ ! 

लाभार्थी आजघडीला योजनेतून हक्काच्या घराचे स्वप्न घेऊन फिरत आहेत, त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा धंदा महापालिकेतील लाचखोरांनी सुरू केला आहे.

प्रधानमंत्री आवास’लाही धुळे मनपाकडून ‘बट्टा’ ! 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः ज्यांना हक्काचे घर नाही, अशा कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित ‘प्रधानमंत्री आवास योजना’ जाहीर केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या या योजनेलाही धुळे महापालिकेने ‘बट्टा’ लावल्याचा प्रकार समोर आला आहे. घरकुलाच्या लाभासाठी आर्थिकदृष्ट्या गरिबांकडूनही पैसे उकळण्याचा धंदा महापालिकेतील काही महाभागांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे पदरमोड करून काही गरजूंनी संबंधित डल्ला मारणाऱ्यांचे खिसेही भरले. मात्र, त्यानंतरही संबंधितांना घरकुलाच्या लाभासाठी चकरा माराव्या लागत आहेत. 

वाचा- तापीवरील ‘मेगा रिचार्ज स्कीम’ थंड बस्त्यात ! -

आर्थिक दुर्बल घटकातील (वार्षिक तीन लाख रुपये उत्पन्न) नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत चार घटकांतून लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. पहिल्या घटकात झोपडपट्टीवासीयांना आहे त्याच ठिकाणी घरे बांधून देणे व उर्वरित तीन घटकांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल (वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत), अल्प उत्पन्न घटक (वार्षिक उत्पन्न सहा लाखांपर्यंत)साठी नवीन बांधकाम, सदनिका, गृह खरेदी तसेच स्वमालकीच्या घराच्या विस्तारासाठी बँकांतर्फे कर्जपुरवठा, आर्थिक दुर्बल घटकांसाठी सार्वजनिक व खासगी भागीदारीतून विकसित होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी ३० चौरसमीटर क्षेत्रापर्यंतच्या सदनिका परवडणाऱ्या दरात उपलब्ध करण्यासाठी अडीच लाखांपर्यंत अनुदान व स्वमालकीच्या जागेवर नवीन घरकुल अथवा विस्तारास अडीच लाखांपर्यंत अनुदान अशा स्वरूपाची ही योजना आहे. 

पैसे उकळण्याचे प्रकार 
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभासाठी जुलै २०१६ मध्ये महापालिकेत अर्ज घेण्यासाठी नागरिकांची अनेक दिवस अक्षरशः झुंबड उडाली होती. गेल्या चार-पाच वर्षांत यातील किती जणांना लाभ मिळाला हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, जे लाभार्थी आजघडीला योजनेतून हक्काच्या घराचे स्वप्न घेऊन फिरत आहेत, त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा धंदा महापालिकेतील लाचखोरांनी सुरू केला आहे. अशा महाभागांची ही लाचखोरी आता चव्हाट्यावर येत आहे. 


पैसे देऊनही चकरा 
घरकुलाच्या अशाच एका प्रकरणात महापालिकेतील एका कर्मचाऱ्याने मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाचे आर्थिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित कुटुंबाने हक्काच्या घराच्या स्वप्नापायी पदरमोड करून, प्रसंगी उसनवारीने पैसे घेऊन संबंधित कर्मचाऱ्याचा ‘खिसा’ भरला. तरीही संबंधित कुटुंबाचे घरकुलाचे काम झालेले नाही. घराचे स्वप्न दूरच वरून या कामासाठी कर्जबाजारी झाल्याने संबंधित कुटुंब हताश आहे. ज्याचे खिसे भरले तो मात्र दाद द्यायला तयार नाही, अशी स्थिती आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे