दोंडाईचातील बालिका अत्याचार प्रकरणी 'एसआयटी' स्थापन

दोंडाईचातील बालिका अत्याचार प्रकरणी 'एसआयटी' स्थापन

धुळे : राजकीय आणि सामाजिक स्तरावर वादाचे प्रकरण ठरत असलेल्या दोंडाईचातील बालिका अत्याचार प्रकरणी  नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनॉयकुमार चौबे यांनी गुरूवारी (ता. 1) आठ अधिका-यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. 

जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे हे पथकप्रमुख आहेत. शिरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित तपासाधिकारी अाहेत. त्यांच्यासह दोंडाईचाचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील सहायक तपासाधिकारी असतील.  उर्वरीत पाच अधिकारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथील आहेत.  

चौबेॆची दोंडाईचा भेट
बालिका अत्याचार प्रकरणी तपासाच्या आढाव्यासाठी श्री. चौबे यांनी गुरूवारी सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊपर्यंत दोंडाईचा पोलिस ठाण्यात तळ ठोकला. त्यांनी आतापर्यंतच्या तपासातील सर्व कागदपत्रे तपासली. तपासासंबंधी विविध सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. नंतर त्यांनी "एसआयटी' पथक स्थापनेची माहिती दिली. रात्री साडेनऊनंतर ते नाशिककडे रवाना झाले. पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक पानसरे, उपविभागीय अधिकारी गावित, पोलिस निरीक्षक पाटील उपस्थित होते. 

जामिनावर पाचला कामकाज 
अत्याचार प्रकरणात पीडित कुटुंबाला धमकी देऊन शैक्षणिक संस्थेची बदनामी टाळण्याचा दबाव टाकल्या प्रकरणी संशयित शिक्षक व पालिकेचा माजी बांधकाम सभापती महेंद्र पाटीलच्या जामीन अर्जावर पाच मार्चला कामकाज होणार आहे. जिल्हा न्यायालयाने शिक्षक पाटीलला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याची चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्याने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. त्यावर आज कामकाज होते. ते पाच मार्चला पुन्हा होणार आहे.

नेमके प्रकरण काय?
दोंडाईचा येथे आठ फेब्रुवारीला ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संस्थेच्या नूतन हायस्कूलच्या मागे असलेल्या पडक्‍या घराच्या अंगणात बालवाडीतील पाचवर्षीय विद्यार्थिनीवर एका नराधमाने अत्याचार केला. शाळेच्या मधल्या सुटीत सकाळी साडेनऊ ते दहाच्या कालावधीत ही संतापजनक घटना घडली. चॉकलेटचे आमिष दाखवून हा प्रकार घडला.

या प्रकरणी 18 फेब्रुवारीला जळगाव येथे गुन्हा दाखल झाला. नंतर तो दोंडाईचाला वर्ग झाला. त्यात ही घटना लपवून ठेवून संस्थेची बदनामी होऊ नये, दवाखान्याचा खर्च करू, पण कुणाला काही सांगू नये, असे सांगत दबाव, धमकी दिल्या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, प्रतीक महाले, नंदू सोनवणे, शिक्षक महेंद्र पाटील यांना आरोपी करण्यात आले. अत्याचार करणाऱ्या अज्ञात नराधमाचा शोधही पोलिस घेत आहेत. रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची सत्ता असलेल्या दोॆडाईचा व शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com