लग्नाच्या दिवशीच नवरदेवावर काळाची झडप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

नांदुरा तालुक्यातील खैरा येथील श्यामराव कावणे यांच्या मंगेश (२५) नामक मुलाचा बुधवारी कुरणगाड येथील गजानन भाकरे यांच्या योगिता नामक मुलशी बुधवारी पार पडला. विवाह सोहळ्यानंतर व-हाडी नवरदेव -नवरीला घेवून एमएच १४ बीसी ४४८० या वाहनाने खैरा येथे परतत होते.

नांदुरा : विवाह सोहळा आटोपून घरी परतत असलेल्या नवरदेव-नवरीच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात नवरदेव जागीच ठार झाला तर नवरी आणि सहा ते सात व-हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना झाडेगाव- खांडवी मार्गावर बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

नांदुरा तालुक्यातील खैरा येथील श्यामराव कावणे यांच्या मंगेश (२५) नामक मुलाचा बुधवारी कुरणगाड येथील गजानन भाकरे यांच्या योगिता नामक मुलशी बुधवारी पार पडला. विवाह सोहळ्यानंतर व-हाडी नवरदेव -नवरीला घेवून एमएच १४ बीसी ४४८० या वाहनाने खैरा येथे परतत होते. त्याचवेळी खांडवी येथून झाडेगाव रस्त्यावर समोरून येणा-या एमएच २८ एच ९६८५  या मालवाहू वाहनाने  नवरदेव-नवरीच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, चालकाच्या पाठीमागे बसलेला नवरदेव चालू वाहनातून सुमारे दीडशे फूट अंतरावर फेकल्या गेला. सडकेचा जबर मार लागल्याने नवरदेव असलेला मंगेश जागीच गतप्राण झाला. तर या वाहनातील नवरी आणि इतर सहा ते सात नातेवाईक गंभीर जखमी झाले. जखमी असलेल्या नवरीला नांदुरा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या  अपघातात नवरदेवाच्या आत्या उषा श्रीराम गायकवाड यांच्यासह नवरीकडील कुरवल्या आणि नातेवाईक जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच खांडवी येथील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. नातेवाईकांचा आक्रोश आणि किंकाळ्यांनी समाजमन हेलावून गेले होते. वरातीत नाचणा-या मित्रांना आपल्या सोबत्याचा मृतदेह खांद्यावर उचलून नेण्याची क्रुर वेळ नियतीने  बुधवारी अनेकांवर आणली होती. गंभीर जखमीमध्ये अपघात ग्रस्त दोन्ही वाहनांच्या चालकांचा समावेश असून या वाहन चालकांवर नांदुरा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याघटनेमुळे खैरा आणि कुरणगाड या दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Marathi news Dhule news husband dead on marriage day