esakal | भूखंड विक्री प्रकरणी महापालिकेची फिर्याद नाकारली 
sakal

बोलून बातमी शोधा

भूखंड विक्री प्रकरणी महापालिकेची फिर्याद नाकारली 

पोलिस अधिकाऱ्याने फिर्याद वाचल्यानंतर वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले आणि संबंधितांची फिर्याद स्वीकारली नाही. त्यांनी संबंधितांना एलसीबीकडे पाठविले.

भूखंड विक्री प्रकरणी महापालिकेची फिर्याद नाकारली 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : येथील मालेगाव रोडवरील गोशाळा आणि शंभरफुटी रोड परिसरातील महापालिकेचा भूखंड परस्पर विक्री झाला असून, महापालिकेचा भूखंड हडप झाल्याने दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, भाजपचे कार्यकर्ते निनाद पाटील यांनी आयुक्त अजीज यांच्याकडे पत्राद्वारे केली. मात्र, पोलिसांनी शुक्रवारी (ता. २१) महापालिकेची फिर्याद स्वीकारली नाही. 

महापालिका आयुक्त शेख यांनी महापालिकेचा भूखंड परस्पर विक्री झाल्याप्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे आयुक्तांचे प्रतिनिधी संजय बहाळकर, प्रकाश सोनवणे आदी प्रथम चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांना दीड तास बसवून ठेवले. पोलिस अधिकाऱ्याने फिर्याद वाचल्यानंतर वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले आणि संबंधितांची फिर्याद स्वीकारली नाही. त्यांनी संबंधितांना एलसीबीकडे पाठविले. तेथे भूखंडाला महापालिकेचे नाव असलेले प्रॉपर्टी कार्ड सादर केल्यास फिर्याद दाखल करता येऊ शकेल, असे एलसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. 


महापालिकेच्या प्रतिनिधींनी महापालिकेचा भूखंडच परस्पर कागदपत्रे बदलून विक्री झाल्यानेच दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी उपस्थित झालो आहोत, असा युक्तिवाद केला. मात्र, महापालिकेची फिर्याद स्वीकारून गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे भूखंड विक्री प्रकरणातील गौडबंगाल वाढले असून, या प्रकरणी न्यायनिवाडा कसा होईल, असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेचा मालेगाव रोडलगतचा भूखंड काही जणांनी सुमारे १८ कोटी ५० लाखांना एका नामांकित मॉल कंपनी, तसेच डॉक्टरला विक्री केल्याचा आरोप होत आहे. या व्यवहारात शहरातील नामांकित भूमाफियाला महापालिका आणि नगरभूमापन कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचे बोलले जाते. या गंभीर प्रकारातील तथ्य जनतेसमोर यावे आणि दोषींवर कारवाई होण्यासाठी सभापती बैसाणे, श्री. पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेख यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. 


पंकज पवार यांची बदली 
या प्रकरणात नगरभूमापन अधिकारी पंकज पवार यांचा संबंध असल्याची तक्रार झाली. असे असताना त्यांची बदली झाल्याने चर्चा सुरू झाली आहे. पवार यांनी बदली करून घेतल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पाठपुरावा करून महापालिकेचा भूखंड वाचविण्यासाठी योग्य ते प्रयत्न होतील, असे सभापती बैसाणे यांनी सांगितले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image