esakal | धुळ्यात कचरा प्रश्न पेटला..नागरिक कचरा घेऊन पोहचले आयुक्त दालनात
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

धुळ्यात कचरा प्रश्न पेटला..नागरिक कचरा घेऊन पोहचले आयुक्त दालनात

sakal_logo
By
रमाकांत घोडराज


धुळे ः कचरा संकलन होत नसल्याने पेठ भागातील काही संतप्त नागरिक आज कचरा (Garbage) घेऊन थेट महापालिका (Dhule Municipal Corporation) आयुक्तांपुढेच उभे राहिले. कचरा संकलन होत नसल्याने निर्माण झालेल्या समस्यांचा पाढाच या नागरिकांनी आयुक्तांपुढे (Commissioners) मांडला. शहरात साचलेला कचरा ही महापालिकेची मालमत्ता असल्याने ती महापालिकेला देण्यासाठी आलो असे संतप्त नागरिकांनी सांगितले. दरम्यान, घंटागाड्या, ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ठेकेदाराकडून पगार झाला नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून या कर्मचाऱ्यांनी कामबंद केले आहे, त्यामुळे ही समस्या उदभवल्याचे कारण समोर आले.

हेही वाचा: धुळ्याचा महापौर ओबीसीच;सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

शहरातील कचराकोंडी काही केल्या फुटत नसल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तर घंटागाड्या, ट्रॅक्टर्सचे दर्शनच दुर्मीळ झाल्याने घराघरांमध्ये तसेच रस्ते, चौकांमध्ये कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. सध्या पावसाळाही असल्याने कचऱ्यामुळे दुर्गंधीसह आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत आहेत. याच समस्यांना कंटाळून पेठ भागातील (गल्ली नंबर-६, माधवपूरा) काही संतप्त नागरिकांनी आज कचऱ्याने भरलेले डस्टबीन घेऊन थेट महापालिका गाठली. उमेश चौधरी, अमित चौधरी, भूषण जाधव यांच्यासह इतर नागरिकांचा यात समावेश होता. आयुक्त अजीज शेख यांच्या दालनात हे नागरिक डस्टबीन घेऊनच गेले, कचरा संकलनासाठी घंटागाड्या येत नसल्याने घराघरांत डस्टबीन कचऱ्याने वाहत आहेत, आमच्या परिसरात भाजीबाजार भरतो त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. हा कचराही उचलला जात नसल्याने दुर्गंधीसह आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. अधिकाऱ्यांना फोन केले तर प्रत्येकजण दुसऱ्या अधिकाऱ्याचे नाव पुढे करतो. कर्मचाऱ्यांचे पगार नसल्याने समस्या असल्याचेही सांगितले गेले. दुसरीकडे लाखो रुपयांचे टेंडर काढले जातात. हा जनतेच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे श्री. चौधरी व नागरिक म्हणाले. नागरिकांची समस्या ऐकून घेत आयुक्त शेख यांनी सहाय्यक आयुक्त विनायक कोते, सहाय्यक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव यांना बोलावत जाब विचारला.

हेही वाचा: कळंबबारी घाटात सागवान लाकडाची तस्करी रोखली


काम बंदचे कारण
गेल्या दोन महिन्यांपासून पगार नसल्याने ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून कामबंद केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ठेकेदाराने उशिरा बिल सादर केल्याचेही सांगण्यात आले. आयुक्त शेख यांनी याप्रश्‍नी ठेकेदाराला दंड का केला नाही असा प्रश्‍न केला व अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा: नंदुरबार जिल्ह्यात मातृवंदना योजनेंतर्गत ३३ हजार महिलांना लाभ

प्रवेशद्वारात टाकला कचरा
आयुक्तांच्या उत्तराने समाधान न झाल्याने कचऱ्याची समस्या घेऊन आयुक्तांकडे आलेल्या संतप्त नागरिकांनी महापालिकेतून जाताना डस्टबीनमध्ये आणलेला कचरा महापालिकेच्या प्रवेशद्वारात टाकून आपला संताप पुन्हा व्यक्त केला. यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशाराही श्री. चौधरी यांनी दिला.

loading image
go to top