esakal | धुळेकरांसाठी चांगली बातमी; नियोजनातील १९० कोटीचा निधी प्राप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळेकरांसाठी चांगली बातमी; नियोजनातील १९० कोटीचा निधी प्राप्त 

माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनीही वाढीव निधीची मागणी नोंदवून ठेवली होती. यानंतर एकूण १९० कोटींचा निधी जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झाला.

धुळेकरांसाठी चांगली बातमी; नियोजनातील १९० कोटीचा निधी प्राप्त 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः महाविकास आघाडी सरकारने येथील जिल्हा नियोजन विभागाला जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर १९० कोटींचा निधी बुधवारी (ता. ९) प्रदान केला. त्यातील सुमारे ११० कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग होईल, तर ३१ कोटींचा निधी कोविडबाबत उपाययोजनांसाठी राखीव आहे. त्यातील काही निधी जिल्ह्याला पूर्वीच प्राप्त असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी दिली. 

वाचा- शिंदखेडा तालुक्यातील तिन्ही कापूस केंद्र बेमुदत बंद ! -

जिल्ह्याचा सुरवातीचा १४७ कोटी २८ लाखांचा प्रारूप आराखडा मंजूर होता. यात जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेचा १२२ कोटी ५० लाख, तर विशेष घटक योजनेचा ३० कोटी चार लाखांचा प्रारूप आराखडा समाविष्ट झाला. नंतर मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कमाल आर्थिक मर्यादेनुसार प्रस्तावित केलेल्या १४७ कोटी २८ लाख रुपयांमध्ये ४२ कोटी ७२ लाख रुपयांची वाढ करून १९० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली होती.

 
उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळे जिल्ह्यातील नागरिकांचे राहणीमान लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास साहित्य घेण्यासाठी तसेच महिला रुग्णालयासाठी व जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसाठी किमान ५० कोटींच्या वाढीव निधी मंजुरीची मागणी केली होती. तसेच माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनीही वाढीव निधीची मागणी नोंदवून ठेवली होती. यानंतर एकूण १९० कोटींचा निधी जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झाला. तो जिल्हा परिषद, इतर स्थानिक स्वराज्य संस्था व निकषानुसार वर्ग करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. यात कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राखीव ३१ कोटींचा निधी वगळता १५९ कोटींचा निधी जिल्हा परिषदेसह निकषानुसार विविध विभागांकडे वर्ग केला जाणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी सांगितले.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image