esakal | सीमेवर तैनात जवानाने दिली ऑनलाइन परिक्षा 
sakal

बोलून बातमी शोधा

soldiers online exam

सुराय (मालपूर, ता. शिंदखेडा) येथील जवान आणि विद्यार्थी नरेंद्र राजेंद्र जाधव यांनी दुसाणे (ता. साक्री) येथील मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात नोंदणी केली. ते कला शाखेचे तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. सद्यःस्थितीत ते जम्मू– कश्मीर येथे भारत मातेच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.

सीमेवर तैनात जवानाने दिली ऑनलाइन परिक्षा 

sakal_logo
By
सुकलाल सूर्यवंशी

दुसाणे (धुळे) : देशाच्या सुरक्षेकामी जम्मू कश्‍मीरमध्ये तैनात असूनही जवानाने शिक्षणाच्या गोडीतून, वेळेचा सदुपयोग करत 
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची ऑनलाइन परिक्षा दिली. याची विशेष दखल घेत मुक्त विद्यापीठाचे नाशिक विभागीय उपसंचालक डॉ. धनंजय माने, दुसाणे एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादाभाऊ भदाणे यांनी जवानाचे अभिनंदन केले. 

सुराय (मालपूर, ता. शिंदखेडा) येथील जवान आणि विद्यार्थी नरेंद्र राजेंद्र जाधव यांनी दुसाणे (ता. साक्री) येथील मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात नोंदणी केली. ते कला शाखेचे तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. सद्यःस्थितीत ते जम्मू– कश्मीर येथे भारत मातेच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. सीमेवर तैनात असतानाही जवान जाधव यांनी मोबाईलव्दारे ऑनलाइन परीक्षा दिली. कोविडमुळे सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. त्यात सर्व्हर डाऊनच्या समस्या असल्या तरी ८० टक्‍के विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत झाली आहे. 

त्‍यापैकी एक जवान जाधव
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत खानदेशसह नाशिक, नगर जिल्ह्यातून २५ हजारांवर विद्यार्थी समाविष्ट आहेत. कोरोनाबाधित व विलगीकरणातील विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली. यात जवान जाधव यांचा समावेश असल्याने सर्वांना अप्रूप वाटले. त्याचे उपसंचालक डॉ. माने यांनी विशेष कौतुक केले. मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तांत्रिक गटाची स्थापन करून दिलासा दिला. काही ठिकाणी पावसामुळे किंवा रेंजमुळे इंटरनेट बंद पडल्याने वेळ वाढवून देण्यात आला. काहींनी जवळील अभ्यासकेंद्रातील संगणकाचा वापर करत परीक्षा दिली. ऑक्टोबरपर्यंत एक लाख ९० हजार विद्यार्थी परीक्षा देतील, असा विश्वास कक्ष अधिकारी विलास दशपुते यांनी व्यक्त केला.

संपादन ः राजेश सोनवणे