जलसाठ्यामुळे सावरपाडा परिसरात बहरू लागल्या फळबागा ! 

भिलाजी जिरे
Tuesday, 27 October 2020

पाण्याच्या उपलब्धतेमुळे कांदा, टोमॅटो, मिरची, वांग्यासारखा भाजीपाला, नगदी पिके घेत आहेत. रब्बी हंगामात गहू, हरभरा, वाटाणा, मसुरासारखे पीक घेत आहेत.

धुळे ः टेंभे प्र. वार्सा (ता. साक्री) गटग्रामपंचायतींतर्गत सावरपाडा क्षेत्रात जामखेली नदी आहे. सुरवातीला ती पावसाळ्यातच वाहत होती. नंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य पाचवीला पुजलेले. यातून लोकसहभाग आणि लुपिन फाउंडेशनच्या पाठबळामुळे सुटका झाली. नदीवर सिमेंट बंधारा झाला. परिणामी, नदी बारमाही झाली. शिवाय डाव्या काठावर जलसाठ्यामुळे पाच एकरवर डाळिंबाची बाग फुलली. 

 

आवश्य वाचा- दोन वर्षाची बालीका तिसऱ्या मजल्यावरून पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचली !

लुपिन फाउंडेशन, देशबंधू मंजू गुप्ता फाउंडेशनने लोकसहभाग, लोकवर्गणीतून जिल्ह्यात जलसमृद्धतेवर भरीव काम झाले आहे. यात सात नद्यांवर माथा ते पायथा पद्धतीने नदीपात्रात नवीन सिमेंट बंधारे बांधले. जुने बंधारे दुरुस्त केले. नदीपात्राचे खोलीकरण केले. पाणी अडविणे व जिरविण्याचे उपक्रम राबविले. प्रामुख्याने या संस्थांनी २९ लहान-मोठे बंधारे बांधले. या कामांमुळे पावसाळ्यात वाहणाऱ्या काही नद्या बारमाही झाल्या आहेत. त्यामुळे विहिरींसह विविध जलस्रोतांची पातळी वाढली आहे. 
टेंभे गटग्रामपंचायतींतर्गत पुनाजीनगरमधील सावरपाड्याला जामखेली नदीत नवीन बंधारा बांधला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गाव व पाड्यांच्या बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे. खरीप हंगामात मका, बाजरी, सोयाबीन, कुळथासारखे पीक घेणारे शेतकरी आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे कांदा, टोमॅटो, मिरची, वांग्यासारखा भाजीपाला, नगदी पिके घेत आहेत. रब्बी हंगामात गहू, हरभरा, वाटाणा, मसुरासारखे पीक घेत आहेत. 

लुपिन फाउंडेशन, गुप्ता फाउंडेशनच्या बंधाऱ्यामुळे विहिरी, बोअरवेलच्या जलपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. रब्बी पीक घेणे शक्य झाले आहे. खरीप पिके घेणाऱ्या गावात फळबागा बहरत आहेत. 
-शशिकांत राऊत, सरपंच, टेंभा गटग्रामपंचायत 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Orchards flourish in Savarpada area due to water shortage