शाळांची "बेल' पालकांच्या हातात! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "लॉक डाउन' झाल्यानंतर सर्वच शाळा बंद झाल्या. "लॉक डाउन' शिथिल झाल्यानंतर शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर "कोरोना'बाबत नेमकी काय स्थिती आहे, त्यानुसार ही प्रक्रिया पुढे जाणार आहे.

धुळे : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "लॉक डाउन' शिथिल झाल्यावर सरकारी, खासगी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. प्रशासनाच्या स्थानिक पातळीवरून शासन निर्देशाप्रमाणे शहरातील शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने चाचपणी, कार्यवाही सुरू झाली आहे. असे असले तरी "कोरोना'च्या भीतीपोटी पालक आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठविण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे शाळा सुरू होण्याची सर्व भिस्त पालकांवरच अवलंबून असल्याचे सध्या तरी चित्र आहे. शहरातील वाढते "कंटेनमेंट झोन'देखील या प्रक्रियेत मोठा अडसर आहेत. 
"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "लॉक डाउन' झाल्यानंतर सर्वच शाळा बंद झाल्या. "लॉक डाउन' शिथिल झाल्यानंतर शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर "कोरोना'बाबत नेमकी काय स्थिती आहे, त्यानुसार ही प्रक्रिया पुढे जाणार आहे. धुळे शहराचा विचार करता "लॉक डाउन' शिथिल झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे भीत- भीत बाजार खुला झाला असला तरी शाळा सुरू होतील की नाही याबाबत साशंकता आहे. 

शाळांकडून मागविला अहवाल 
शासनाच्या निर्देशाप्रमाणे महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी यांनी पहिली ते आठवी या वर्गासाठी शहरातील सर्व माध्यमाच्या खासगी शाळा संस्थांचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, व्यवस्थापन समित्यांना पत्र दिले आहे. मुख्याध्यापकांनी सचिव, संस्थाध्यक्ष, पालक व शालेय व्यवस्थापन समिती यांची शाळास्तरावर बैठक घेऊन शाळा सुरू करण्याबाबत तत्काळ पुढील कार्यवाही करावी व कार्यवाहीचे नियोजन/ अहवाल तत्काळ सादर करावा, असे पत्रात म्हटले आहे. शाळांकडून प्राप्त अहवाल वरिष्ठांकडे सादर झाल्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही होणार आहे. 

कंटेनमेंट झोन मोठा अडसर 
धुळे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण धुळे शहरात आढळले आहेत. त्यामुळे कंटेनमेंट झोन वाढत आहेत. आतापर्यंत शहरात 98 कंटेनमेंट झोन घोषित झाले आहेत. अर्थात त्यातील काही झोन रद्द झाले असले तरी शाळा सुरू करण्यासाठी शहरातील हे "कंटेनमेंट झोन' मोठा अडसर ठरतील अशी शक्‍यता आहे. शाळा कंटेनमेंट झोनमध्ये नसली असे गृहीत धरले तरी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी हे विविध भागातून येणार त्यामुळे या प्रश्‍नातून मार्ग काढणे कठीण जाईल अशी शक्‍यता आहे. अर्थात आयुक्‍त, जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात त्याकडे लक्ष असेल. 

सद्यःस्थिती अशी... 
- शहरात 165 खासगी शाळा 
- महापालिकेच्या 28 शाळा 
- उर्दू 12, तर मराठी 8 शाळा 
- 50,253 विद्यार्थ्यांसाठी पुस्तके शाळांना पोहोच 
- मनपा शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी सध्या सर्वे सुरू 
- मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन लर्निंगसाठी प्रयत्न 
- विशेषतः सीबीएसईच्या शाळांकडून ऑनलाइन लर्निंग सुरू 
- इतर इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडूनही ऑनलाइन धडे 
- कंटेनमेंट झोन, शाळांचे लोकेशन याबाबतही अधिकाऱ्यांकडून अभ्यास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule parents not intrested child school