esakal | ‘एसटी’ अद्यापही पहिल्या ‘गिअर’मध्येच! 
sakal

बोलून बातमी शोधा

parivahan bus

लॉकडाउनमुळे बंद झालेली एसटीची आंतरजिल्हा बससेवा २० ऑगस्टपासून सुरू झाल्यानंतर पाच दिवसांत प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत आहे. धुळे आगारातून नाशिक, औरंगाबाद, जळगाव, चोपडा या मार्गावर बससेवा सुरू आहे. २६-२७ ऑगस्टपासून ग्रामीण भागातही बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा आहे. 
-अनुजा दुसाने, आगारप्रमुख, धुळे 

‘एसटी’ अद्यापही पहिल्या ‘गिअर’मध्येच! 

sakal_logo
By
धनराज माळी

धुळे : कोरोनाच्या संकटामुळे बंद पडलेली राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बससेवा सुरू झाली खरी; पण कोरोना संकटापूर्वी ज्या एसटी बससाठी प्रवासी प्रतीक्षा करायचे, जागा मिळविण्यासाठी कसरत करायचे त्याच बसला आज एका सीटवर एकच प्रवासी, अशी सुविधा असतानाही प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे, असे असले तरी धिम्या गतीने का होईना चार-पाच दिवसांत प्रवाशांची संख्या वाढली आहे. धुळे आगारातून पहिल्या दिवशी आठ फेऱ्या झाल्या होत्या. रविवारी (ता.२३) त्या ३० झाल्या. त्यामुळे येत्या काही दिवसांत दिलासादायक चित्र उभे राहील, अशी ‘एसटी’च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे. 

अनलॉकच्या प्रक्रियेत सुरवातीला जिल्हांतर्गत व आता २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा सेवा सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी (२० ऑगस्ट) धुळे मध्यवर्ती बसस्थानकातील बसच्या केवळ आठ फेऱ्या झाल्या होत्या. रविवारी एकूण ३० फेऱ्या झाल्या. अर्थात, १५ बस विविध मार्गांवर धावल्या. धुळे बसस्थानकातून नाशिक, औरंगाबाद, जळगाव व चोपडा या मार्गांवर सध्या बससेवा सुरू आहे. इतर आगारांतून विविध मार्गावर बससेवा सेवा सुरू आहे. 
 
२२ प्रवाशांची गरज 
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बसमधील प्रवाशांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग राखले जाईल, यादृष्टीने एका बसमध्ये २२ प्रवासी बसविले जातात. एका सीटवर एकच प्रवासी असतो. शिवाय भाडेदेखील पूर्वीप्रमाणेच आकारले जात असल्याने बसस्थानकातून बस मार्गस्थ होण्यासाठी २२ प्रवासी आवश्‍यक आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेता २२ प्रवासी मिळालेच नाहीत, तर किमान २० प्रवासी असले तरच बस सोडली जाते. 
 
अशी आहे स्थिती... 
२० ऑगस्ट ः फेऱ्या...०८, एक हजार १३९ किलोमीटर प्रवास...उत्पन्न...१८ हजार ३३५ रुपये 
२३ ऑगस्ट ः फेऱ्या...३०...तीन हजार ८४० किलोमीटर प्रवास... उत्पन्न...८४ हजार ४१५ रुपये 
 
उत्पन्नात जमीन-अस्मानाचे अंतर 
एसटीच्या रोजच्या उत्पन्नाचा विचार केला, तर कोरोना संकटाच्यापूर्वी धुळे आगाराचे रोजचे उत्पन्न १४ ते १५ लाख रुपये होते. २० ऑगस्टपासून सुरू झालेल्या आंतरजिल्हा बससेवेनंतर हे उत्पन्न चौथ्या दिवसापर्यंत केवळ ८४ हजार ४१५ एवढे झाले. अर्थात, रोजच्या उत्पन्नात जमीन- अस्मानाचे अंतर आहे. पूर्वीपेक्षा बसमधील प्रवाशांची संख्या निम्म्याहूनही खाली आली आहे. 
 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image