esakal | ‘एसटी’चे आता गणेशमूर्ती, निर्माल्य संकलन 
sakal

बोलून बातमी शोधा

parivahan bus

विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना होत आहेत.‌ त्यास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. नियमांचे पालन न केल्यास गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. कृत्रिम तलावात विसर्जनानंतर मूर्तींची वाहतूक कशी करावी, हा प्रश्न होता.

‘एसटी’चे आता गणेशमूर्ती, निर्माल्य संकलन 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे ः नागरिकांनी दान केलेल्या गणेशमूर्ती व निर्माल्य वाहून नेण्यासाठी मालवाहू एसटीचा वापर होणार आहे. त्यासाठी महापालिकेला एसटी महामंडळाकडून २० बस दिल्या जातील. येथील अधिकाऱ्यांकडून प्रथमच हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. 
शहरात आवश्‍यक ३७ ठिकाणी कृत्रिम तलाव केले आहेत. तेथे गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन शनिवारी (ता. २९) पत्रकार परिषदेद्वारे झाले. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिका आयुक्त अजीज शेख, एसटीचे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, उपअधीक्षक सचिन हिरे, मनपा स्थायी सभापती सुनील बैसाणे, उपायुक्त शांताराम गोसावी आणि विविध पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. 
आयुक्त शेख म्हणाले, की विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना होत आहेत.‌ त्यास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. नियमांचे पालन न केल्यास गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. कृत्रिम तलावात विसर्जनानंतर मूर्तींची वाहतूक कशी करावी, हा प्रश्न होता. महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील यांच्यामार्फत एसटीच्या विभाग नियंत्रक श्रीमती सपकाळ यांच्याशी चर्चा झाली. यात सजावटीच्या एसटी बसद्वारे गणेशमूर्तींच्या वाहतुकीचा निर्णय झाला. त्यासाठी श्रीमती सपकाळ यांनी बसचे भाडेही कमी केले. पोलिस प्रशासन, महापालिका आणि एसटी महामंडळाने संयुक्तपणे ही संकल्पना मूर्त रूपात आणण्यासाठी प्रयत्न केले. मूर्ती आणि निर्माल्य वाहतुकीसाठी महापालिकेकडून काही वाहने, ट्रॅक्टरचाही वापर केला जात होता. यंदा एसटीच्या मालवाहू बसचा वापर होईल. 

पोलिसांचा कडक बंदोबस्त 
कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी यंदा गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आले आहेत. त्यात गणेश मंडळांचा कायदा-सुव्यवस्था, शांतताकामी चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा मिरवणुकीला बंदी आहे. कायदा- सुव्यवस्थेसाठी विसर्जनदिनी सरासरी हजारांवर पोलिस तैनात असतील. त्यांच्या मदतीसाठी राज्य राखीव दलाची तुकडी असेल, असे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image