सिनेस्‍टाईल..पहाटे तीनला कोंबिग ऑपरशन; पोलिसांना सापडले खरेखुरे चोर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

पहाटे तीन ते सकाळी सहापर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविण्याची सूचना दिली होती. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. पोलीस दिसताच पळ काढणाऱ्या या गुन्हेगारांना सिनेस्टाईल पाठलाग करत पथकाने ताब्यात घेतले.

धुळे : शहरातील साक्री रोड भागात तीन घरफोड्या आणि चौथ्या घरफोडीच्या तयारीत असलेले मोस्ट वॉन्टेड दोन सराईत गुन्हेगार कोंबिग ऑपरेशनवेळी शनिवारी (ता. ३) पहाटे धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला हाती लागले. या गुन्हेगारांवर विविध पोलीस ठाण्यात तब्बल ३५ गुन्हे दाखल आहेत. त्यांना बेड्या ठोकल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी यशस्वी कारवाईतील पोलीस पथकाला १० हजाराचे बक्षिस जाहीर करत शाब्बासकी दिली. 

पोलीस अधीक्षक पंडित यांनी शनिवारी पहाटे तीन ते सकाळी सहापर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविण्याची सूचना दिली होती. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. असे असताना सरासरी २५ ते ३० वर्षे वयोगटातील इम्रान उर्फ बाचक्या शेख खालीद (रा. अजमेरानगर, धुळे) आणि वसीम जैन्नुदीन शेख (रा. चांदतारा चौक, धुळे) यांनी साक्री रोड परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्यांचा धमाका लावला. त्यांनी कुमारनगरमधील श्री झुलेलाल भवन आणि मंदिराची दानपेटी फोडली. सेंट्रल बँकेलगत वास्तव्यास असलेले चंदन दिनेश पंजाबी यांच्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर चढून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. यात खिडकीतून मोबाईल लांबविला. पद्मनाभनगर येथे जाकीर शेख हुसेन शेख यांचे घर फोडले. संबंधितांनी शहर पोलीस ठाण्याला घटनेची माहिती कळविली. 

सिनेस्टाईल पाठलाग 
दरम्यान, गस्तीवरील पोलिस पथकाने नाकाबंदी करत घटनेतील गुन्हेगारांचा शोध सुरू केला. तीन ठिकाणच्या घरफोडीत, चोरीच्या प्रयत्नात हाती फारसे काही लागले नसल्याने दोघे गुन्हेगार मोगलाईतील पुलाजवळ चौथ्या घरफोडीच्या तयारीत होते. पोलीस दिसताच पळ काढणाऱ्या या गुन्हेगारांना सिनेस्टाईल पाठलाग करत पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोनपोत, चांदीचे दागिने, मोबाईल आणि अडीच हजाराची रोकड, हत्यारांमध्ये टॉमी, स्क्रू ड्रायव्हर, दुचाकी, असा मिळून ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. शहराचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दोघा गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. पोलीस अधिक्षक पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक पाटील, सहाय्यक निरिक्षक श्रीकांत पाटील, हवालदार भिकाजी पाटील, मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, सतीश कोठावदे, प्रल्हाद वाघ, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, सचिन साळुंके, अविनाश कराड, नवल वसावे, भदाणे यांनी ही कारवाई केली. 
 
मालेगावला आमदारांच्या घरावर फायरिंग 
दीड वर्षांपूर्वी मालेगाव येथील आमदारांच्या घरावर इम्रान उर्फ बाचक्याने नऊ राऊंड फायरिंग केली होती. त्यात सुदैवाने अनुचीत घटना घडली नव्हती. त्यामुळे इम्रान मोस्ट वॉन्डेट गुन्हेगार होता. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी रोख बक्षिस जाहीर केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule police morning combing operation and original thief arrested