esakal | पोषण आहार साठ्यावरून शंका-कुशंका; अधिकाऱ्यांची गोची 
sakal

बोलून बातमी शोधा

poshan aahar

शहरातील ऐंशी फुटी रोडवरील तिरंगा चौकाजवळ असलेल्या अँग्लो ऊर्दू हायस्कूलमधील शालेय पोषण आहाराच्या अनुषंगाने आमदार शाह यांच्या स्वीय सहाय्यकाचा महापालिका शिक्षण मंडळ अधिकारी महेंद्र सोनवणे यांना फोन आला.

पोषण आहार साठ्यावरून शंका-कुशंका; अधिकाऱ्यांची गोची 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः शहरातील ऐंशी फुटी रोड परिसरातील एका ऊर्दू शाळेत शालेय पोषण आहाराचा साठा पडून असल्याबाबत आलेल्या तोंडी तक्रारीवरून महापालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकाऱ्यांसह अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन पाहणी केली. पाहणीत साठा व रेकॉर्ड बरोबर असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. 
दरम्यान, याप्रश्‍नी मात्र आमदार फारूक शाह यांचा एफआयआर दाखल करा, असा अधिकाऱ्यांकडे आग्रह होता. 
शहरातील ऐंशी फुटी रोडवरील तिरंगा चौकाजवळ असलेल्या अँग्लो ऊर्दू हायस्कूलमधील शालेय पोषण आहाराच्या अनुषंगाने आमदार शाह यांच्या स्वीय सहाय्यकाचा महापालिका शिक्षण मंडळ अधिकारी महेंद्र सोनवणे यांना फोन आला. त्यावरून श्री. सोनवणे यांच्यासह तुषार वाणी, जिल्हा परिषदेच्या लेखाधिकारी मनीषा कुलकर्णी, पुरवठा निरीक्षक एल. बी. चौधरी, एच. एच. महाजन आदींनी शाळेत जाऊन पाहणी केली, रेकॉर्ड तपासले. तपासणीत माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठीचा पोषण आहार ४० गोण्या व प्राथमिकसाठीचा १० गोण्या, असा एकूण ५० गोण्या साठा आढळून आला. ज्या विद्यार्थ्यांचा पोषण आहारवाटप झाला आहे त्यांच्यासह ज्यांचा झालेला नाही, त्याबाबत रेकॉर्ड तपासण्यात आले. या तपासणीत प्रत्यक्ष आढळून आलेला साठा व रेकॉर्डवरील नोंदी बरोबर असल्याचे अधिकाऱ्यांना आढळल्याचे प्रशासन अधिकारी सोनवणे यांनी सांगितले. 

अधिकाऱ्यांची गोची 
दरम्यान, शाळेतील शालेय पोषण आहाराची चोरी होते, विद्यार्थ्यांना ते वाटप होत नाही, रिक्षातून काही गोण्या नेल्या गेल्या, असे म्हणत आमदार शाह यांनी काही व्हिडिओ क्लिप अधिकाऱ्यांना दाखविल्या व याबाबत पोलिसांत एफआयआर दाखल करा, असे अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, व्हिडिओ क्लिप नेमक्या कुठल्या आहेत, त्यांची सत्यता काय याबाबत स्पष्टता होत नाही तोपर्यंत एफआयआर दाखल कसे करायचे, असे म्हणत अधिकाऱ्यांनी संबंधित व्हिडिओ क्लिप व तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांकडे द्या, या प्रकरणी समिती नेमू व चौकशीअंती पुढील कारवाई करू, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. शेवटी अधिकारी तेथून निघून आले. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image