esakal | ‘डीन'मार्फत खासगी हॉस्पिटलचे ऑडिट 
sakal

बोलून बातमी शोधा

private hospital audit

वाढत्या मृत्यूदराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नमुने तपासणीची संख्या वाढविणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कंटेनमेंट झोनची परिणामकारक अंमलबजावणी करण्याची सूचना केंद्र सरकारने येथील जिल्हा प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसह नागरिकांचीही जबाबदारी वाढली आहे.

‘डीन'मार्फत खासगी हॉस्पिटलचे ऑडिट 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : ‘कोरोना’शी मुकाबला करणाऱ्या धुळे जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांत मृत्यूदर वाढला. त्यामुळे जिल्हा केंद्र सरकारच्या रडारवर आहे. या स्थितीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना खासगी हॉस्पिटलचे ऑडिट आणि संबंधितांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. 
शहरासह जिल्ह्याची ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची एकूण संख्या दहा हजारांजवळ पोहोचली आहे. यात आतापर्यंत सात हजार ८१६ रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाले असून, एक हजार ७७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रिल ते सहा सप्टेंबरपर्यंत महापालिका क्षेत्रात १३१, तर उर्वरित ग्रामीण भागात १५५, असे एकूण २८६ ‘कोरोना’बाधित रुग्ण मृत्युमुखी पडले. यात काही दिवसांपासून सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये मिळून रोज सरासरी ५ ते ९ बाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे केंद्राने चिंता व्यक्त केली आहे. 

केंद्राची सूचना 
वाढत्या मृत्यूदराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नमुने तपासणीची संख्या वाढविणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कंटेनमेंट झोनची परिणामकारक अंमलबजावणी करण्याची सूचना केंद्र सरकारने येथील जिल्हा प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसह नागरिकांचीही जबाबदारी वाढली आहे. प्रशासनाच्या सूचना, आवाहनाला साथ देणे गरजेचे आहे. लोकसहभागातूनच कोरोना हद्दपार होऊ शकेल. 

जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका 
जिल्हाधिकारी संजय यादव म्हणाले, की जिल्ह्याचा मृत्यूदर खूप नाही, पण थोडा वाढला आहे. सरकारी रुग्णालयापाठोपाठ खासगी रुग्णालयात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसात खासगी हॉस्पिटलमध्ये सरासरी १९ जणांचा मृत्यू झाला. सद्यःस्थितीत नियंत्रणामुळे दाखल रुग्णांच्या तुलनेत मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचा दर अर्थात मृत्यूदर (सीएफआर) २.९२ वर आला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत काळजी करावी अशी स्थिती असली तरी जिल्ह्यातील एकूण स्थिती हाताबाहेर गेलेली नाही. जिल्ह्यातील साडेसात हजारांवर रुग्णांना आपण बरे, कोरोनामुक्त करू शकतो तर मृत्यूदरावरही नियंत्रण आणू. यात सरकारपाठोपाठ खासगी हॉस्पिटलला मार्गदर्शन करू, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या `डीन`मार्फत `प्रोटोकॉल ट्रीटमेंट` करण्यास सांगितले जाईल, असे जिल्हाधिकारी यादव यांनी नमूद केले. 

धुळे जिल्ह्याचा मृत्यूदर (सरकारी, खासगी हॉस्पिटल मिळून) 

महिना..........केसेस..........दरमहा मृत्यू..........मृत्यूदर 
एप्रिल..........२८.............०७...................२५.०० 
मे...............१२८...........१३...................१०.१६ 
जून.............९६६............४१..................४.२४ 
जुलै............१९८८...........५१..................२.५७ 
ऑगस्ट.........५५४२..........१५०.................२.७१ 
सप्टेंबर.........७९६............१६...................२.०१ 
एकूण...........९४४८..........२७८.................२.९४ 
(तीन दिवसांपूर्वीची स्थिती) 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top