हॉस्‍पिटल अधिग्रहीत केल्‍याचे समजले अन्‌ संपुर्ण स्‍टॉपचे पलायन...

निखिल सूर्यवंशी
Sunday, 19 July 2020

कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या एक हजार ९२८ झाली. पैकी महापालिका क्षेत्रात सरासरी ९५० रुग्ण आढळले. त्यात सकाळपर्यंत २५० रुग्णांवर उपचार सुरू होते. दुपारनंतर पुन्हा रूरुग्णसंख्येत वाढ झाली. तसेच या क्षेत्रात आतापर्यंत बाधित ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

धुळे : महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. विविध उपाययोजना अमलात आणूनही यंत्रणेला स्थिती नियंत्रणात येणे अडचणीचे ठरत आहे. अशात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी शहरातील खासगी रुग्णालये अधिग्रहणाचा निर्णय घेतला. प्रथम पांझरा नदीकिनारी असलेले सिद्धेश्‍वर हॉस्पिटल अधिग्रहीत झाले आहे. मात्र, कोरोनाच्या धाकाने या रुग्णालयातील अर्धा स्टाफ पळून गेला आहे. 
जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या एक हजार ९२८ झाली. पैकी महापालिका क्षेत्रात सरासरी ९५० रुग्ण आढळले. त्यात सकाळपर्यंत २५० रुग्णांवर उपचार सुरू होते. दुपारनंतर पुन्हा रूरुग्णसंख्येत वाढ झाली. तसेच या क्षेत्रात आतापर्यंत बाधित ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सर्वच भागात कमी-अधिक फरकाने कोरोनाने शिरकाव केला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा व महापालिका प्रशासनाने हिरे महाविद्यालयाशी संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल), पॉलिटेक्निक, बाफना कॉलेज कोविड सेंटर म्हणून घोषित केले. शिवाय काही महाविद्यालय, खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरू केली. 
प्रशासनाने सर्वप्रथम शहरातील सोयीसुविधायुक्त सिद्धेश्‍वर हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी अधिग्रहीत केले. सरकारी रुग्णालयाच्या परवानगीने कोरोनाग्रस्त रुग्णांना सिद्धेश्‍वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्याचा निर्णय झाला. त्यास दोन दिवस उलटत नाही तोपर्यंत कोरोनाच्या धाकाने सिद्धेश्‍वर हॉस्पिटलमधील निम्मा स्टाफ पळून गेला. हॉस्पिटलमधील मनुष्यबळ कमी झाल्याने सिद्धेश्‍वरच्या व्यवस्थापनाने हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाकडे मनुष्यबळाची मागणी केली आहे. त्यामुळे विचित्र पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आधीच हिरे महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, तसेच सिव्हिलमध्ये मनुष्यबळाची कमतरता, तेथे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी काही प्रमाणात नियुक्त करून कामकाज रेटून नेले जात आहे. त्यात अधिग्रहीत खासगी हॉस्पिटलमधील स्टाफ कोरोनाच्या धाकाने पळून जात असल्याने नेमकी काय भूमिका घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात, या विवंचनेत जिल्हा व महापालिका प्रशासन आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule private hospital staff run away corona virus