esakal | धुळे मनपाच्या नोटीसांना खासगी हॉस्पिटलांनी दिली केराची टोपली 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे मनपाच्या नोटीसांना खासगी हॉस्पिटलांनी दिली केराची टोपली 

भरारी पथकांनी ९ सप्टेंबरला काही हॉस्पिटल्सना भेटी देत दरफलक लावण्याबाबत निर्देश दिले होते दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार नोंदणी रद्द करण्याचा इशाराही दिला होता. 

धुळे मनपाच्या नोटीसांना खासगी हॉस्पिटलांनी दिली केराची टोपली 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही खासगी हॉस्पिटल्सकडून अवाजवी बिले आकारली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने भरारी पथके नेमली, या पथकांनी सर्व खासगी हॉस्पिटल्सना रुग्णांवरील उपचाराची बिले सादर करण्यासाठी नोटिसा बजावल्या खऱ्या पण, या नोटिसांना बहुतांश हॉस्पिटल्सनी केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे. 

कोरोनाबाधितांवर शहरातील १३ खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या हॉस्पिटल्समध्ये कोरोनाबाधितांसाठी बेड आरक्षित करण्यात आले आहेत. अनेक कोरोनाबाधित रुग्ण या हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी दाखलही होत आहेत. मात्र, अवाजवी बिले आकारली जात असल्याने तक्रारी होत आहेत. काही ठिकाणी यावरून रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, राजकीय, सामाजिक संघटना यांच्यात वादही झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनीही भरारी पथके नेमण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने दोन पथके नेमली आहेत. अवाजवी बिलांचा प्रश्‍न लक्षात घेऊन पथकांनी संबंधित सर्व १३ हॉस्पिटल्सना नोटिसा बजावल्या होत्या. 

हॉस्पिटल्सकडून प्रतिसाद नाही 
महापालिकेच्या भरारी पथकांनी २५ ऑगस्टला कोरोनाबाधितांवरील उपचाराचे दरफलक दर्शनी भागात लावण्याबाबत हॉस्पिटल्सना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर ४ सप्टेंबरला रुग्णांवरील उपचाराची बिले सादर करण्यासाठी नोटिसा बजावल्या. मात्र, या नोटिसांना बहुतांश हॉस्पिटल्सनी केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे. काही हॉस्पिटल्समध्ये दरफलक लावले पण इतर काहींनी अद्यापही कार्यवाही केलेली नाही. दरम्यान, भरारी पथकांनी ९ सप्टेंबरला काही हॉस्पिटल्सना भेटी देत दरफलक लावण्याबाबत निर्देश दिले होते दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार नोंदणी रद्द करण्याचा इशाराही दिला होता. 


अकरा हॉस्पीटलकडून दुर्लक्ष 
दाखल कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचाराची बिले सादर करण्याबाबत नोटिसा बजावून आत्ता दहा-अकरा दिवस झाले. मात्र, केवळ दोन हॉस्पिटल्सकडून अशी बिले सादर झाली आहेत. सेवा हॉस्पिटलकडून ३४ व लोकमान्य हॉस्पिटलमधील एक सादर झाले आहे. उर्वरित ११ हॉस्पिटल्सनी अद्यापही याबाबत प्रतिसाद दिलेला नाही. संबंधित खासगी हॉस्पिटल्सकडून प्रतिसाद नसल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले. दरम्यान, बिलांबाबत प्राप्त सर्व दहा तक्रारी सोडविल्याचे अधिकारी म्हणाले. 


ज्या बिलांबाबत तक्रारी होत्या, त्यातील बहुतांश तक्रारी सोडविल्या आहेत. बिले सादर करण्याबाबत मात्र हॉस्पिटल्सकडून प्रतिसाद नाही. त्यामुळे याबाबत पुढे काय कार्यवाही करायची याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. 
- विनायक कोते, सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी (भरारी पथक, शहर विभाग) 
 

संपादन- भूषण श्रीखंडे