धुळ्यात जलवाहिन्यांसाठी निधी द्या; पाणीपुरवठा राज्यमंत्र्यांकडे मागणी 

रमाकांत घोडराज
Wednesday, 9 December 2020

नवीन आणि काही जुन्या वसाहतीत नवीन जलवाहिन्यांसाठी निधी उपलब्ध करावा, अशा मागणीचे निवेदन आमदार शाह यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री बनसोडे यांना दिले. 

धुळे ः शहरातील नवीन, तसेच काही जुन्या वसाहतीत पाणीपुरवठ्याची सोय नसल्याने तेथील नागरिकांची पाण्यासाठी मोठी गैरसोय होते. अशा भागात नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार फारूक शाह यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली. 

आवश्य वाचा- विधानसभा नव्हे ग्रामपंचायत निवडणूक तरी यादीत दोन हजार मतदारांची अदलाबदल

धुळे शहराचा विस्तार वाढला आहे, लोकसंख्या वाढली आहे. शहराच्या चारही बाजूला महामार्गालगत, तसेच इतर ठिकाणी नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. मात्र, या भागांमध्ये पाणीपुरवठ्याची सोय नाही. त्यामुळे त्या- त्या भागातील नागरिकांच्या याबाबतीत तक्रारी आहेत. सुविधा उपलब्ध करण्याची त्यांची मागणी आहे. तशी निवेदन आपल्याला प्राप्त आहेत. या पार्श्वभूमीवर शहतील अशा नवीन आणि काही जुन्या वसाहतीत नवीन जलवाहिन्यांसाठी निधी उपलब्ध करावा, अशा मागणीचे निवेदन आमदार शाह यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री बनसोडे यांना दिले. 

अक्कलपाडा योजनेबाबत तक्रार 
शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी १६९ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे. मात्र, वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटत आलेला असताना, या योजनेचे २० टक्के कामही झालेले नाही. शिवाय योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे दिसत आहे, अशी तक्रारही आमदार शाह यांनी मंत्री बनसोडे यांच्याकडे केली. योजनेच्या कामाबाबत माझ्या कार्यालयात अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशीमार्फत याची चौकशी करावी, चौकशी होईपर्यंत काम थांबवावे, ठेकेदाराला देयक अदा करू नये, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी श्री. शाह यांनी केली आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule provide funds for waterways dhule demand mla by minister water supply