
शेतकऱ्यांना बी- बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करा !
धुळे : जिल्ह्यात कापसाच्या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र, कापसावर अलीकडे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यापासून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करतानाच येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी- बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध होतील, असे नियोजन कृषी विभागाने करावे, असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
हेही वाचा: कमी रुग्णसंख्येत धुळे जिल्हा प्रथम..कोरोनावर राजकारण नको !
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सत्तार म्हणाले, की हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा तुटवडा जाणार नाही, बोगस बियाणे विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्राम कृषी विकास समित्यांच्या माध्यमातून बोंडअळी निर्मूलन, कीटकनाशकांची अवाजवी फवारणी टाळण्यासाठी जागृती करावी. राष्ट्रीयीकृत बँक, सहकारी बँकांसह खासगी बँकांनी वेळेत पीककर्जाचा पुरवठा करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा. एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
हेही वाचा: धुळे जिल्ह्यात चौदा ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प
६८५ कोटींचे पीककर्ज
जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी ६८५ कोटी, तर रब्बीसाठी ७७ कोटींच्या पीककर्ज वितरणाचे नियोजन आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी सांगितले, की खरीप हंगामात चार लाख आठ हजार हेक्टर क्षेत्रात कापसासह विविध पिकांच्या पेऱ्याचे नियोजन आहे. बी- बियाणे, खतांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना झाली आहे. बोंडअळीच्या निर्मूलनासाठी जागृती होत आहे. श्री. सोनवणे यांनी ‘एक गाव- एक वाण’, ‘विकेल ते पिकेल अभियान’, भेंडी उत्पादन, ज्वारी उत्पादनाविषयी माहिती दिली. श्री. रंधे, आमदार गावित यांनी विविध सूचना केल्या.
संपादन- भूषण श्रीखंडे
Web Title: Marathi News Dhule Provide Seedschemical Fertilizers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..