धुळे जिल्ह्यात चौदा ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प

शासकीय व खासगी रुग्णालयांनी मेडिकल ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाबाबत परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे.
धुळे जिल्ह्यात चौदा ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प

धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत असले, तरी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे. आगामी काळात कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांनी मेडिकल ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाबाबत परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

धुळे जिल्ह्यात चौदा ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प
कमी रुग्णसंख्येत धुळे जिल्हा प्रथम..कोरोनावर राजकारण नको !

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात ‘कोविड- १९’ संसर्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, ‘कोरोना’चे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संपर्कातील व्यक्तींची चाचणी

पालकमंत्री सत्तार म्हणाले, की कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नियोजन करावे. कोविड केअर रुग्णालयांची नियमितपणे तपासणी करीत अग्निसुरक्षा उपकरणे, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेची घटनास्थळी तपासणी करावी. रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळजीपूर्वक वापर करावा. जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले, की जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत ३३ हजार ८४७ रुग्ण आढळले. पैकी ३३ हजार ६६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या तीन हजार ५९५ रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर गेल्या आठवड्यात १.५२ टक्के होता. रुग्णांच्या तुलनेत खाटांची संख्या अधिक आहे. ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा नियमितपणे पुरवठा होत आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची चाचणी होत आहे.

धुळे जिल्ह्यात चौदा ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प
दिलासादाय..नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक

१४ ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प

‘कोविड- १९’ वरील उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्हा वार्षिक योजना व आमदार निधीतून जिल्ह्यात १२ ठिकाणी, तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. तसेच १८ ते ४५ वयोगटातील लसीकरणाला पाच केंद्रांवर सुरवात होत असल्याचे जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले. ‘कोरोना’चे नोडल अधिकारी डॉ. पाटील यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोनाविषयीची सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रंधे, आमदार गावित यांनी विविध सूचना केल्या.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com