esakal | धुळ्यात काडतुसांसह चार पिस्टल हस्तगत; राजस्थान कनेक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Arrest

धुळ्यात काडतुसांसह चार पिस्टल हस्तगत; राजस्थान कनेक्शन

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी


धुळे : गैरउद्योगांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या धुळे शहराचे आता राजस्थान (Rajasthan) कनेक्शन समोर आले आहे. तेथील संशयित थेट चार पिस्टलसह (Pistol) वीस जिवंत काडतूस विक्रीसाठी धुळ्यात आला होता. त्याच्याकडून पिस्टल कोण व कशासाठी खरेदी करणार होते हाही तपासाचा भाग असून या प्रकरणी पोलिसांनी (Dhule Police) राजस्थानच्या संशयिताला अटक केली आहे. तसेच व्यापाऱ्याची ३६ लाखांना फसवणूक केल्या प्रकरणी पंजाबच्या संशयितालाही येथील पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा: फागणे-तरसोदचे काम सहा महिन्यांत होणार पूर्ण-नितीन गडकरी

शहरात गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी आलेल्या राजस्थानच्या संशयित युवकाला चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या पथकाने सापळा रचत शिताफीने अटक केली. त्याच्याकडे चार पिस्टलसह वीस जिवंत काडतूस, असा एकूण एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला. मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीवर संशयित पिस्टल विक्रीच्या उद्देशाने येत असल्याची माहिती चाळीसगाव रोड ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी (ता. ३०) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास सापळा रचला. त्यात इक्बाल खान वली मोहम्मद (वय १९, रा. मजत, ठाकरखेडा शिला डहाणी, समदडी तहसील, शिवाना, जि. बाडमेर, राजस्थान) असे त्याने नाव सांगितले. त्याच्याकडून प्रत्येकी २५ हजारांच्या चार गावठी पिस्टल व २० हजारांच्या २० जिवंत काडतूस आढळल्या. न्यायालयाने या संशयिताला चार सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक एन. जी. चौधरी, हवालदार पंकज चव्हाण, कैलास वाघ, बी. आय. पाटील, संदीप कढरे, अविनाश पाटील, हेमंत पवार, स्वप्निल सोनवणे, प्रशांत पाटील आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा: बोरी धरण ओव्हर फ्लो,15 दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग


पंजाबामधून एकास अटक
धुळे शहरातील व्यापाऱ्याची ३६ लाखांत फसवणूक करणाऱ्या पटीयाला (पंजाब) येथील संशयितास आझादनगर पोलिसांनी अटक केली. सोमनाथ शंकर बागड (रा. पवन नगर, दाता सरकार मंगल कार्यालयाजवळ, धुळे) या व्यापाऱ्याने समाना (जि. पटियाला, पंजाब) येथील नवीनकुमार भगवानदास बब्बर याच्यावर विश्‍वास ठेवत २०१६ मध्ये ३५ लाख ९५ हजार ४८३ रुपयांचा मका दिला. व्यापारी बागड यांनी वेळोवेळी बब्बर याच्याकडून पैसे मागितले. मात्र, त्याने नंतर देतो असे सांगत टाळाटाळ केली. दोन वर्षांपासून तो फरार होता. फसवणूक प्रकरणी आझादनगर ठाण्यात फिर्याद दाखल झाली. पोलिसांनी बब्बरला पकडण्यासाठी पंजाबामध्ये पथक पाठविले. स्थानिक पोलिसांच्या मदत पथकाने त्याच्या घरावर पाळत ठेवली. पोलिसांनी सोमवारी (ता. ३०) पहाटे पाचच्या सुमारास बब्बरला बेड्या ठोकल्या. आझादनगरचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक एम. जे. सय्यद, हवालदार सुनील पाथरवट, विश्राम पवार, अझहर शेख आदींनी ही कारवाई केली.

loading image
go to top