बियांपासून विघटनशील राख्या

तुषार देवरे
Sunday, 26 July 2020

ग्रामीण भागातील नागरिक आत्मनिर्भर झाले पाहिजे. याला चालना मिळावी, यासाठी पुणे येथील अन्नदाता सहजीवन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत उत्पादनासाठीचे मूर्तिमंत उदाहरण पर्यावरणपूरक राख्या तयार करून सुरवात झाली आहे.

देऊर : राखी पौर्णिमा म्हणजे स्नेहसंबंध दृढ करणारा सण. भाऊ-बहिणीच्या रेशमी नात्याचा रक्षाबंधन सण अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. बाजारात रंगीबेरंगी राख्यांची रेलचेल आहे. मात्र याला अपवाद ठरवत परिसरातील उपलब्ध गिलके, लाल, पांढरी गुंज, रिठा, त्रिदेव आदी बियांपासून विघटनशील अर्थात पर्यावरणपूरक अठरा प्रकारांत राख्या तयार केल्या आहेत. या राखी पौर्णिमेला बियांच्या राख्यांनी भाऊ- बहीण हे नाते साजरे करण्याचा प्रयत्न नांद्रे (ता. धुळे) येथील प्रांजली बोरसे यांनी केला आहे. इकोफ्रेंडली राख्यांना राज्य, परराज्यांतून मागणी आहे. लॉकडाउन कालावधीत ग्रामीण भागातील आत्मनिर्भरची सुरवात जिल्ह्यासाठी स्वावलंबन, आशादायी आहे. 
ग्रामीण भागातील नागरिक आत्मनिर्भर झाले पाहिजे. याला चालना मिळावी, यासाठी पुणे येथील अन्नदाता सहजीवन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत उत्पादनासाठीचे मूर्तिमंत उदाहरण पर्यावरणपूरक राख्या तयार करून सुरवात झाली आहे. या राख्या तयार करण्यासाठी नांद्रे गावातील वीस विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यार्थी राख्या तयार करताना स्वकल्पकता वापरत आहेत. जीवनकौशल्याचे धडे कृतीतून घेत आहेत. 

महानगरांमधून वाढली मागणी 
पर्यावरणपूरक राख्यांना आतापर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, नागपूर, मालेगाव, औरंगाबाद, धुळे, हैद्राबाद बेंगलोर येथे कुरिअरने राख्या पाठविल्या. २० जुलैपर्यंत राख्यांची मागणी नोंदवली गेली. आता उर्वरित राख्या स्थानिक बाजारपेठेत विक्री केल्या जाणार आहेत. राख्यांसाठी लागणाऱ्या बिया दोन वर्षांपासून संकलित केल्या. यामागे सृष्टी, व्यक्ती, शेती, माती, गाव, नगर ही नाती ही बळकट करण्याचा उद्देश आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या पर्यावरण स्नेही जीवनशैली स्वीकाराची सुरवात बियांच्या राख्यांपासून केली आहे. मातीतील झाडांची जोपासना करून त्यांचे नैसर्गिक पद्धतीने विघटन होईल. 
-प्रांजली बोरसे, नांद्रे (ता. धुळे) 

 

संपादन : राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule raksha bandhan child created seeds rakhi